मोदींचे मौन गुन्ह्याची कबुली: आनंद शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 01:24 AM2018-10-16T01:24:09+5:302018-10-16T01:24:37+5:30
‘मी टू’वर देशभर बोलले जात असताना मोदी मात्र मन की बात करत फिरत आहेत, त्यांनी आता जन की बात करावी, असे आवाहनही त्यांनी केली.
पुणे : राफेलसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ना संसदेत काही बोलायला तयार आहेत ना जनतेत! त्यांचे हे मौन हीच त्यांनी राफेल विमान खरेदीत केलेल्या गुन्ह्याची कबुली आहे अशी टीका माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी केली. ‘मी टू’वर देशभर बोलले जात असताना मोदी मात्र मन की बात करत फिरत आहेत, त्यांनी आता जन की बात करावी, असे आवाहनही त्यांनी केली.
शर्मा सोमवारी काँग्रेस भवन येथे आले होते. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले, ‘‘राफेल विमानांच्या खरेदीसंबंधात काँग्रेसने अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. शंकास्पद अशा अनेक गोष्टी या व्यवहारात झाल्या आहेत. त्या सर्वांचे निराकरण करणे हे मोदींचे कर्तव्य आहे. मात्र ते संसदेतही विरोधकांना सामोरे जाऊन काही बोलायला तयार नाहीत व देशवासीयांनाही जाहीरपणे काही सांगत नाहीत. अशा वेळी त्यांचे मौन हेच त्यांच्या गुन्ह्याची कबुली आहे असे समजण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे व त्याने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना महत्त्व आहे.’’
पुढे ते म्हणाले, पेट्रोल, डिझेल इंधनाच्या वाढत्या किमतीविषयी शर्मा म्हणाले, काँग्रेसच्या काळातही दर वाढले होते. त्यावेळी हेच मोदी काँग्रेस देशाची फसवणूक करत आहे असे सांगत होते. काँग्रेसने निदान दरांवर नियंत्रण ठेवले होते, मात्र भाजपा सरकारला तेही जमत नाही. डॉलरचा दर नियंत्रणात ठेवू अशी मोदी यांची त्या वेळी भाषा होती, पण ते आता ती विसरले आहेत व दरवाढीचे समर्थन करत आहेत.
काँग्रेसभवन येथे या वेळी आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, कांची अगरवाल, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, नीता राजपूत, संगीता तिवारी, सोनाली मारणे, विशाल मलके, भूषण रानभरे व पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. शर्मा यांनी त्यांच्याशीही संवाद साधला व पक्षाच्या पुणे शहर व जिल्ह्यातील स्थितीविषयी चर्चा केली.
‘मी टू’ वर ‘जन की बात’ करा
देशात मी टू चे वादळ घोंगावत आहे. अनेक महिला स्वत:वर झालेल्या अन्यायाविषयी लैगिंक शोषणाविषयी, पदाचा, अधिकारांचा गैरफायदा घेणाऱ्यांविषयी बोलत आहेत. त्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर काही आरोप झाले आहेत.त्याविषयीही मोदी काही बोलत नाहीत. ते आरोप खोटे आहेत असे तरी त्यांनी सांगावे पण तेही ते सांगत नाहीत. मंत्रिमंडळाचे मोदी नेतृत्व करतात. त्यांनी बोललेच पाहिजे.
आरोप निराधार असतील तर तसे स्पष्ट केले पाहिजे, मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे मौन बाळगले आहे. ते बेटी बचाववर बोलतात, बेटी
पढाव म्हणतात पण बेटी काही बोलत आहे त्याविषयी मात्र एक शब्दही काढत नाहीत. मन की बात सोडून त्यांनी आता जन की बात करणे गरजेचे आहे, असे शर्मा म्हणाले.