पुणे : 12 मार्च 1993मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेल्या मोहम्मद ताहीर मर्चंट याचा ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे पावणेचार वाजता मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा त्रास होता. मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मोहम्मद ताहीर मर्चंट याला विशेष टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला अगोदर मुंबईतील ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.सप्टेंबर 2017मध्ये त्याला येरवडा कारागृहात हलविण्यात आले होते. त्याला अगोदरपासूनच हृदयविकाराचा त्रास होता. त्याची तो नियमितपणे औषधे घेत होता. बुधवारी मध्यरात्रीनंतर त्याच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर येरवडा कारागृहातील डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला ससून रुग्णालयात हलवण्यास सांगितले. त्यानुसार कारागृहाने त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा पहाटे मृत्यू झाला, असे कारागृह अधीक्षक यू. टी. पवार यांनी सांगितले.कारागृहात कोणत्याही कैद्याचा मृत्यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन नायब तहसीलदारांच्या देखरेखीखाली केले जाते. त्यानुसार तहसीलदारांच्या उपस्थितीत मोहम्मद ताहीर मर्चंट याचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. मर्चंट याच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्याचे नातेवाईक ससून रुग्णालयात आले आहेत. शवविच्छेदनानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवलेल्या मुस्तफा डोसा याचा 28 जून रोजी जे.जे. रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्याला उच्च रक्तदाब व मधुमेहाचा होता. विशेष टाडा न्यायालयाने 16 जून रोजी त्याला 1993 साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवले होते. न्यायालयाने दोषी ठरवल्याबद्दल डोसाला धक्का बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता. या निर्णयानंतर त्याची तब्येत खालावत गेली. त्यामुळे न्यायालयाने त्याला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र डोसाने स्पष्ट नकार दिला. ‘मरायचंच आहे तर रुग्णालयात दाखल का होऊ?’ असे त्याने न्यायालयाला सांगितले होते. डोसाची तब्येत बिघडल्याने त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्याचा उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली होती.
काय आहे नेमके प्रकरण?12 मार्च, 1993 साली मुंबईमध्ये 12 साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले होते. या स्फोटात 257 निष्पापांचा बळी गेला होता, तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते.याप्रकरणी 129 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.