Prithviraj Chavan: भागवत, भाजप फॅसिस्ट, हिटलर त्यांची प्रेरणा; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
By राजू इनामदार | Published: December 2, 2024 08:30 PM2024-12-02T20:30:51+5:302024-12-02T20:31:32+5:30
भागवतांच्या तीन मुले जन्माला घाला या त्यांच्या विचारावर काय बोलणार अशी टीकाही त्यांनी भागवत यांच्यावर केली
पुणे: मोहन भागवत, भारतीय जनता पक्ष हे फॅसिस्ट आहेत, हिटलर ही त्यांची प्रेरणा आहे, त्यामुळे समाज वाचवायचा असेल तर तीन मुले जन्माला घाला या त्यांच्या विचारावर काय बोलणार अशी थेट टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संघ व भाजप यांच्यावर केली. रशियातही लोकशाही आहे, तिथे ९९ टक्के मतदान होते, आपली वाटचालही तिकडेच सुरू आहे असे ते म्हणाले.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांबरोबर बोलताना चव्हाण यांनी भाजपला लक्ष्य करत त्यांच्यावर शरसंधान केले. ते म्हणाले, मोहन भागवत यांनी केलेले आवाहन त्यांच्या विचारसरणीला योग्य आहे. ‘हम दो हमारे दो’ हा आपला विचार आहे. देशाने आता १४० कोटी लोकसंख्येची मर्यादाही पार केली आहे. अशा स्थितीत कोणीही असा विचार करणार नाही, मात्र ते करतात. याचे कारण हिटलर त्यांची प्रेरणा आहे. देशात खरोखरच लोकशाही आहे का असा प्रश्न त्यांनी केला.
जगातील सर्व देश आता बॅलटजगातील सर्व देश पेपरवरच मतदान घेतात. याचे कारण इलेक्ट्रॉनिक यंत्रांमधून डेटा घालवता येतो. मी आता नाही तर यापूर्वीही यंत्रांबद्दल बोललो आहे. तपासणी करून काहीही होत नाही, कारण यंत्रात जमा झालेला सर्व डेटा नष्ट करता येतो. बॅलेट पेपरवर ते शक्य होत नाही. त्यामुळेच मी मागणी केली आहे की व्हीव्हीपॅट मधील सर्व चिठ्ठ्यांची मोजणी करावी. आधीची आकडेवारी व ही आकडेवारी जुळली नाही की नक्की काय झाले ते लक्षात येईल. मात्र आयोग तसे करू देत नाही.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अनेक चांगले निर्णय दिले. या देशातील लोकशाही बळकट करणारा निर्णय देणे मात्र त्यांनी टाळले. आमदारांची अपात्रता व अन्य खटले त्यांच्यासमोर होते. सुनावणी झाली होती. खटला निकालावार होता. विधानसभेची मुदत संपणार आहे हेही चंद्रचुड यांना माहिती होते. तरीही त्यांनी निकाल देणे टाळले. लोकशाही राज्यव्यवस्था बळकट करण्याची संधी त्यांना होती, मात्र त्यांनी घालवली अशी टीका चव्हाण यांनी केली.