मोहन भागवत, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी घेतले मदन दास देवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 10:34 AM2023-07-25T10:34:51+5:302023-07-25T10:35:09+5:30
मदन दास देवी यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत संघाच्या मोतीबाग या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह मदन दास देवी यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संघाचे विद्यमान सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यावेळी उपस्थित असतील. मदन दास देवी (८१) यांचे सोमवारी (दि. २४) पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. मदन दास देवी यांचे नातेवाईक पुण्यात असून, निवृत्तीनंतर देवी यांचे वास्तव्य पुण्यातच होते. आजारपणामुळे निसर्गोपचारासाठी त्यांना बेंगळुरू येथे हलविण्यात आले होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सह-सरकार्यवाह मदनदासजी देवी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहन भागवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी घेतले. यावेळी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वयंसेवक सह भाजप पक्षातील पदाधिकारी इतर मान्यवर मोठ्या संख्येनेउपस्थित होते. यावेळी मोतीबाग येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
अल्पपरिचय
मदन दास देवी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघ योजनेतून देण्यात आलेले पहिले प्रचारक होते. अनेक वर्षे त्यांनी परिषदेची संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे त्यांचे मूळ गाव. शालेय शिक्षणानंतर उच्चशिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात त्यांनी १९५९ मध्ये प्रवेश घेतला. एम.कॉम. नंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली. राष्ट्रीय स्तरावर रँक मिळवून ते सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण झाले. पुण्यात शिक्षण घेत असतानाच मोठे बंधू खुशाल दास देवी यांच्या प्रेरणेने त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्यानंतर त्यांनी आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. जवळपास ७० वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून सहसरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला. मदन दास देवी यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत संघाच्या मोतीबाग या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर ११.३० वाजता अंत्यसंस्कार होतील.