पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक फॅसिस्ट संघटना आहे. केंद्र सरकार हे नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे नसून हे सरकार संघच चालवत आहे. तर, सरसंघचालक मोहन भागवत हे देशाचे हिटलर आहेत, अशी टीका ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केली.विविध परिवर्तनवादी संघटनांतर्फे बुधवारी आयोजित ‘लोकशाहीसाठी संघर्ष यात्रे’च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्र सेवा दल येथे झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अशोक ढवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. भालचंद्र कांगो, राष्ट्र सेवा दलाचे सदाशिव मगदूम, लाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी) कॉ. भीमराव बनसोड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे धनाजी गुरव, लोकायतचे नीरज जैन आदी उपस्थित होते.वैद्य म्हणाले, ‘‘संघ ही हिंसेवर विश्वास ठेवणारी संघटना असून त्यांचा राज्यघटनेवर विश्वास नाही. निवडणुकीतील पराभव टाळण्यासाठी ते भविष्यात लष्कराचाही वापर करू शकतात. त्यांच्या विरोधात परिवर्तनवादी संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.’’ अलका जोशी यांनी सूत्रसंचालन केले.>सध्या देशात अर्थनीतीचा प्रभाव असल्याने लोकशाहीचा पाया कमकुवत होऊ लागला आहे. लोकशाहीला वाचविण्यासाठी तरुण पुढे येऊ लागल्याचे सकारात्मक चित्र आहे. यातून नवा इतिहास घडणार आहे. महाराष्ट्रामध्ये जगाला प्रगतिशील विचार देण्याची शक्ती आहे.- डॉ. गणेश देवी
मोहन भागवत हे हिटलर
By admin | Published: September 22, 2016 2:02 AM