PMC | घरपट्टी सवलत पुन्हा लागू होण्याचे खरे श्रेय पुणेकरांचे- मोहन जोशी
By राजू इनामदार | Published: April 19, 2023 06:02 PM2023-04-19T18:02:42+5:302023-04-19T18:05:05+5:30
सवलत पुन्हा लागू होण्याचे खरे श्रेय पुणेकरांचे आहे, भाजपने त्यावर हक्क दाखवू नये असे ते म्हणाले...
पुणे : स्वायत्त असलेल्या महापालिकाने विशेष ठराव करून पुणेकर मालमत्ताधारकाला घरपट्टीत अनेक वर्षांपूर्वी दिलेली ४० टक्केची सवलत काढून घेण्याचा राज्य सरकारला अधिकारच नव्हता. मात्र तरीही त्यांनी ते केले व अखेर पुणेकरांच्या रेट्यापुढे भारतीय जनता पक्षाला झुकावेच लागले अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. सवलत पुन्हा लागू होण्याचे खरे श्रेय पुणेकरांचे आहे, भाजपने त्यावर हक्क दाखवू नये असे ते म्हणाले.
मंत्रीमंडळाने ही सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्यांची प्रत्यक्ष अमलबजावणी मात्र होत नव्हती असे स्पष्ट करून जोशी म्हणाले, काँग्रेसने त्यासाठी सातत्याने आंदोलने केली. अखेर प्रभू रामचंद्रांला आम्ही साकडे घातले. शेवटी सरकारला निर्णय घ्यावाच लागला. यावरून श्रीराम त्यांच्याबरोबर नाही तर आमच्याबरोबरच असल्याचे सिद्ध होते.
कसब्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला मात दिली. सलग २८ वर्षे ताब्यात असलेला हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने काढून घेतला. त्याचवेळी पुणेकर भाजपवर किती रूष्ट झाले आहे ते दिसले. त्यामुळेच भाजपला झुकावे लागले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील घरपट्टीच्या प्रश्नाविषयी उदासिन होते. पुणेकरांवर विनाकारण वार्षिक काही हजारांचा बोजा पडणार आहे याबद्दल काहीच माहिती नसल्यासारखे त्यांनी हात वर केले होते. त्यामुळे आता निर्णय अमलात येण्याचे श्रेय त्यांनी घेऊ नये, ते श्रेय पुणेकरांचे आहे असे जोशी म्हणाले.