- राजू इनामदार
पुणे : रविवार पेठेतील बोहरी आळीतील गर्दी. वरून आग ओकणार सूर्य. बोहरी आळीतील खरेदी करून जीव कावला की रस्त्याच्या कडेला लागलेली एक गाडी दिसते. त्यावर एक वृद्ध व्यक्ती कुल्फी विकते. त्यांचे नाव मोहन. सहज म्हणून तिथे जावे तर लगेचच ‘या, या’! म्हणून स्वागत होते. झाडाचे एक स्वच्छ पान समोर येते. त्यावर असते थंडगार कुल्फी. चमच्याने तोडून खायची. एक तुकडा जिभेवर ठेवला त्याचा गारवा जाणवतो. तो गारवा पोटात उतरतो व सगळा आसमंतच थंड वाटू लागतो.
या परिसरातून ३०, ४० वर्षांपूर्वी फिरणाऱ्या अनेकांनी या गारव्याचा अनुभव घेतला असेल. मोहनराव आता नाहीत, मात्र त्यांच्या मुलांनी त्यांच्याच नावाने आता या कुल्फीचा व त्याचबरोबर आइस्कीमचाही ब्रॅण्ड केला. ‘मोहन कुल्फी’ अशाच नावाने आता रविवार पेठेत जुने दुकान तर आहेच, शिवाय जंगली महाराज रस्ता, कोथरूडमध्येही शाखा आहे. ३ मुले आहेत. तिघांनीही वडिलांचे नाव अमर केले. जुन्या पिढीतील अनेकांना आजही रस्त्यावर उभे राहून गाडीवर कुल्फी विकणारे मोहनराव आठवतात.
कुल्फीसह आइस्क्रीमचे सर्व प्रकार हे कुटुंब स्वत: तयार करते. कुल्फी तयार करण्याचा त्यांचा खास ‘फार्म्युला’ आहे. बासुंदी नावाचा एक नवाच प्रकार त्यांनी सुरू केला आहे. कुल्फीत एक दोन नाही तर चक्क ७ प्रकारचे स्वाद तयार केले जातात. भारीभारी कंपन्यांनाही मात देईल अशी ही कुल्फी व बासुंदी आहे. सर्व माल उच्च दर्जाचा. त्यात कसलीही तडजोड करत नसल्यानेच त्यांची सर्व उत्पादने ग्राहकांच्या पसंतीची झाली आहे. नव्या पिढीलाही या कुल्फीने भुरळ घातली आहे.
कुठे - सोन्या मारुती चौकात, जंगली महाराज रस्त्यावर
कधी - दिवसभर व रात्रीही
आणखी काय - विविध प्रकारच्या आइस्क्रीम, बासुंदी