----
राजगुरूनगर : खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते तालुक्याचे हुकूमशहा आहेत तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे या त्यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या बाहुल्या आहेत. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेत त्यांचा मनमानी कारभार सुरु आहे अश टिका शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली
खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम व जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या जागेचा पूर्वीचा ठराव बहुमताने रद्द करण्यात आला. ही माहिती मिळाल्यानंतर, या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड पंचायत समिती सभागृहात शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही इमारतीची जागा बदलल्यास येत्या २६ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रवादी नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले की, माजी आमदार स्व. गोरे यांनी इमारतीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी आणून इमारत होण्यासाठी मंत्रालय पातळीपर्यंत कोरोना काळात प्रयत्न केले. त्यातच संसर्ग होऊन त्यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर स्थानिक शिवसेनेकडून या जागेत इमारत होण्यासाठी अस्मितेचा प्रश्न निर्माण केला गेला. गेल्या आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत बहुमताच्या जोरावर या जागेचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. पंचायत समितीची पाच कोटी रुपयांची नवीन इमारत, सध्याच्या पंचायत समितीसमोर मंजूर आहे. माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांनी इमारत मंजूर करून घेऊन, ठेकेदार नेमत भूमिपूजनही केले होते. मात्र, आमदार मोहिते हे या कामाला खोडा घालतात असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य देवीदास दरेकर, राहुल गोरे, नितीन गोरे, विजयसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, तनुजा घनवट, अशोक खांडेभराड, शिवाजी वरपे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, महिला प्रमुख नंदा कड, सुरेश चव्हाण, ज्योती आरगडे, अमर कांबळे, रविंद्र करंजखेले, मारुती सातकर, एल. बी. तनपुरे, सरपंच किरण गवारे, भरत थिगळे आदी उपस्थित होते.
---
फोटो क्रमांक: १३
फोटो ओळ: राजगुरुनगर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदे बोलताना शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील..