पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. स्थायी समितीमध्ये भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने मोहोळ यांची निवड निश्चित मानली जात आहे. मात्र, महापौर, उपमहापौरपदाप्रमाणेच ही निवडणुकही विरोधकांकडून लढवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या रेखा टिंगरे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक येत्या २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महापालिका कार्यालयात होणार आहे.अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना मोहोळ यांच्यासमवेत महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, शहराध्यक्ष योगेश गोगावले व भाजपाचे अन्य नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या वतीने रेखा टिंगरे यांनी अर्ज दाखल केला. महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे व अन्य नगरसेवक यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘स्थायी’ अध्यक्षपदासाठी भाजपाकडून मोहोळ
By admin | Published: March 25, 2017 4:12 AM