पुणे : लोकसभेसाठी उमेदवार म्हणून पुण्यातून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावावर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीने (सीईसी) शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते. लवकरच अन्य मतदारसंघांतील यादीबरोबर पुण्याचेही नाव जाहीर करण्यात येईल, असे समजते.
त्यामुळे आता पुण्यामध्ये महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व महाविकास आघाडी म्हणजे ‘इंडिया फ्रंट’चे काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना होईल. मोहोळ यांचे नाव भाजपने आधीच जाहीर केले असून, ते प्रचारालाही लागले आहेत. धंगेकर यांचे नाव अद्याप जाहीर झाले नसले, तरी त्यांचेच नाव अंतिम होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. तसाच निर्णय काँग्रेसच्या ‘सीईसी’ने घेतला असल्याची माहिती मिळाली.
मंगळवारी रात्री काँग्रेसच्या सीईसीची दिल्लीत बैठक झाली. तत्पूर्वी सीईसीच्या सदस्यांनी पक्षाकडून या मतदारसंघात इच्छुक असलेले प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याकडेही विचारणा केली असल्याचे समजते. मोहोळ यांच्याविरोधात धंगेकर यांना उमेदवारी दिली, तर लढत कशी होईल, अशी विचारणा त्यांच्याकडे केली असल्याचे समजते. त्यांनीच जोशी-मोहोळ यापेक्षा धंगेकर मोहोळ अशी लढत चांगली होईल असे सांगितले असल्याची माहिती मिळाली.
धंगेकर यांनी कसबा विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी सलग २८ वर्षे भाजपकडे असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला होता. त्यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी एकत्रितपणे काम करत भाजपला मात दिली होती. तिच जादू या निवडणुकीत परत दिसावी, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे.