सचिन तडवळ यांचा पुढाकार : बघ्यांची भूमिका न घेता पुढे सरसावण्याचे आवाहन
पुणे : देशात हजारो लोकांचा रस्ते अपघातात केवळ वेळेवर मदत न मिळाल्याने मृत्यू होतो.आता नवीन शासन नियमानुसार मदत करणा-याला चौकशीत अडकवू नये, असे आदेश आहेत. त्यामुळे अपघात झाल्यास अनोळखी व्यक्तीलाही माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सचिन तडवळ यांनी केले आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: अशा प्रकारे तत्परता दाखवत माणुसकीचे दर्शन घडवले.
सचिन तडवळ २४ सप्टेंबर रोजी हडपसरहून घरी जात असताना त्यांनी रामवाडीजवळ अपघातात जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक माणूस पाहिला. आजूबाजूच्या लोकांनी बघ्यांची भूमिका घेतलेली असताना तडवळ यांनी प्रसंगावधान राखत त्यांच्या डोक्याला रुमाल बांधला. ट्रॅफिक पोलीस पांडुरंग कदम यांच्या मदतीने रिक्षा थांबवून त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले. दरम्यान, अपघातग्रस्त व्यक्तीच्या फोनवरुन त्यांच्या घरीही अपघाताबाबत माहिती दिली. नातेवाईक पोहोचेपर्यंत ते स्वत: तेथेच थांबले.
नातेवाईक हॉस्पिटलमध्ये पोहोचले. काही वेळात रुग्ण शुध्दीवर आले, त्यांची स्थितीही सुधारत होती. तडवळ यांनी रुग्णाच्या सर्व वस्तू नातेवाईकांकडे सोपवल्या. ‘रुग्णाच्या माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहूनच मला माझ्या कर्तव्याची पोचपावती मिळाली’, अशा भावना तडवळ यांनी व्यक्त केल्या.
‘लोकमत’शी बोलताना सचिन तडवळ म्हणाले, ‘दररोज कितीतरी अपघात होतात, पण वेळेवर उपचार न मिळाल्याने कित्येक लोक मरण पावतात. आपण त्यांना लवकर मदत केली तर एखाद्याचा जीव वाचू शकतो. अशा गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन माणुसकी जिवंत ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.’