बारामती :राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांची बदनामीकारक माहिती सोशल मीडियावरुन व्हायरल करण्याची धमकी देवुन यांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परीषदेत याबाबत माहिती दिली.अधिक माहिती देताना शिरगांवकर यांनी सांगितले की, प्रकरणात सचिन ज्ञानेश्वर पडळकर (वय ३०, रा. पिलिव, पडळकरवस्ती, ता. माळशिरस, जि.सोलापूर), डॉ. इंद्रकुमार देवराज भिसे (वय ४२, रा. पेरीयार भवन, खरामळा, ता. शिरुर, जि. पुणे), दत्तात्रय पांडूरंग करे (वय ३४, रा. करेवस्ती, सदाशिवनगर, ता. माळशिरस), विकास शिवाजी अलदर (वय ३४, रा. आडेगाव, ता माढा ), तात्यासाहेब लक्ष्मण कारंडे (वय २६, रा. माळेगाव, ता. माढा) ,बिरुदेव लक्ष्मण कारंडे (वय २३, रा. माळेगाव, ता. माढा ), सुशांत दादासाहेब करे (वय १९, रा. नरवणे, ता. माण, जि. सातारा), दिपक विठ्ठल जाधव (वय २, रा. वडजल, ता. माण), नितीन राजेंद्र पिसे (वय २३, रा.म्हसवड, ता. माण) यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या ९ जणांसह जगन्नाथ जानकर ( रा. पळसावडे, ता. माण), विनायक मासाळ व राजू अर्जून आणि रमेश कातुरे (रा. आटपाडी, जि. सांगली) यांचा समावेश आहे. या चार आरोपींची पूर्ण नावे पोलिसांकडे नाहीत. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या आरोपींचा शोध सुरु आहे.संबंधित आरोपींकडे तपास सुरु असताना त्यांच्यावर या आधीदेखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्ह्याचा तपास सुरु असताना आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता.यामध्ये तीन चारचाकी वाहने, ४ लाख ९२ हजार रोख रक्कम पोलिसांना मिळाली होती. ९ मे रोजी आरोपींना खंडणीची रक्कम स्वीकारताना बारामतीत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी अण्णासाहेब बळवंत रुपनवर (वय ५४, रा. कुरबावी, ता. माळशिरस) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आरोपींनी ४ मे रोजी बारामतीतील कृष्णसागर हॉटेलमध्ये तर ६ मे रोजी स्वारगेट येथील नटराज हॉटेलात फिर्यादीला बोलावून ना. जानकर व दोडतले यांची बदनामीकारक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करू, दोडतले यांना मारहाण करून त्यांचे हातपाय तोडू अशी भीती दाखवून फिर्यादी रुपनवर यांना त्याप्रकरणात अडकविण्याची भीती दाखवली होती.त्यापोटी फिर्यादीच्या मध्यस्थीने पहिल्यांदा ५० कोटी रुपयांची खंडणी मागणी करुन तडजोडीअंती ३० कोटी रुपये देण्याचे ठरले. त्यातील १५ कोटींचा पहिला हप्ता बारामती येथे देण्यास सांगितले होते.त्यानुसार बारामतीत आरोपींना पकडण्यात आले.
या टोळीतील पडळकर विरोधात चार गुन्हे, खंडणी,डॉ. भिसे विरोधात खंडणी, कट रचून खूनाचा प्रयत्न आदी ३ गुन्हे, करे विरोधात खंडणी आणि सरकारी कामात अडथळा दोन, तर अलदर विरोधात चोरीचा आणि खंडणीचा, जगन्नाथ जानकर व राजू अर्जून यांच्यावर मारामारी, बेकायदा गर्दी, जमाव जमवणे, व अन्य गुन्हे दाखल असल्याचे शिरगांवकर यांनीसांगितले.पोलिस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर अधिक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ नुसार मंजूरीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आल्याचे शिरगांवकर यांनी सांगितले.———————————