पुणे : मुंढवा परिसरात दहशत पसरवणार्या सुमित गौड व त्यांच्या टोळीवर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली आहे. सुमित ऊर्फ लखन रवींद्र गौड (वय ३२, रा. वडगावशेरी), सिद्धार्थ देवीदास शावळकर (वय २१, रा. केशवनगर), राहुल सोमनाथ धावरे (वय २३, रा. सोमनाथनगर, वडगावशेरी) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत. सुमित गौड हा फरार असून अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
केशवनगर येथे आरोपी फिर्यादीच्या तोंड ओळखीच्या मुलाला मारहाण करीत होते. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असताना तिघांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कंबरेचे पिस्टल काढून उलट्या बाजूने त्यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
सुमित गौड याने साथीदारांसह खूनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, बदल्याची भावना ठेवून नुकसान करुन दहशत माजवणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे विमानतळ, चंदननगर, मुंढवा पोलिस ठाण्याच्या परिसरात केले आहेत. मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी पोलिस उपायुक्त ए राजा यांच्या मार्फत मोक्का कारवाईचा प्रस्ताव अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला. शर्मा यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजुरी दिली. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी पोलिस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलिस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, सहायक फौजदार अभय काळे, पोलिस अंमलदार हेमंत झुरुंगे, ऋषिकेश टिळेकर, रवींद्र देवढे, वैभव मोरे यांनी सहाय्य केले. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत केलेली ही ११२ वी कारवाई आहे.