पुणे : डिलिव्हरी बॉयला अंधारात नेऊन त्याला हत्याराचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या शुभम गायकवाड टोळीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
शुभम राघु गायकवाड (वय २४, रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर), करण किसन शिंदे (वय १९, रा. रामटेकडी, हडपसर), मुज्जमिल मतीन शेख (वय १८), ओम राजू भैनवाल (वय १८), विशाल रवि जाधव (सर्व रा. रामटेकडी, हडपसर) व तीन अल्पवयीन अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शुभम गायकवाड आणि विशाल जाधव हे फरार आहेत.
फिर्यादी हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. २६ जानेवारी रोजी ते एका ग्राहकांची ऑर्डर देण्यासाठी रामटेकडी येथील डॉ. डब्ल्यु आर खान ऊर्दु शाळेच्या मागील गल्लीत गेले होते. यावेळी अंधारातून तीन ते चार जण अचानक पुढे आले. त्यांनी हत्याराचा धाक दाखवून मारहाण करुन त्यांच्याकडील सॅकमधील हार्ड डिस्क, चेक बुक, २ हजार रुपये असा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता.
शुभम गायकवाड याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन वेळोवेळी त्याचे साथीदार बदलून तसेच त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश केला होता. त्याच्या टोळीने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमविणे, अतिक्रमण करुन घर पेटवून देणे असे अनेक गुन्हे केले आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये प्रस्ताव तयार करुन पोलिस उपायुक्त आर राजा यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे सादर केला होता. मनोज पाटील यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजुरी दिली.
सहायक पोलिस निरीक्षक दिंगबर बिडवे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव शेलार, पोलिस अंमलदार मनोज साळुंखे, अमोल कदम, उत्रेश्वर धस, चैत्राली यादव यांनी प्रस्ताव तयार करण्यास सहाय्य केले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर या वर्षात आतापर्यंत मोक्काची ही १४ वी कारवाई आहे.