पुणे : परिसरात दहशत वाढवण्यासाठी तरुणाला शिवीगाळ करुन दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गिरणी चालकाला पोलिसांना सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पप्पु उर्फ प्रवीण अनंता येणपुरे व त्याच्या ४ साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० डिसेंबर रोजी आंबेगाव खुर्द येथे जागडे पिठाच्या गिरणी जवळ घडला होता. दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पोलिसांनी गणेश तमाराम जाधव (१९, रा. अटल चाळ, कात्रज), अनिकेत उर्फ गौरव शिवाजी शेंडकर (२१, रा. रेणुसे चाळ, कात्रज), यश बाळु म्हसवडे (२०, रा. सुंदरनगर, मांगडेवाडी), अजय सदाशिव रेणुसे (२५, रा. अटळ चाळ, कात्रज) यांना अटक केली आहे. तर टोळी प्रमुख पप्पु उर्फ प्रविण अनंता येणपुरे (२६, रा. सच्चाई माता नगर, आंबेगाव खुर्द) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
आरोपी येणपुरे हा प्रत्येक गुन्हा करत असताना सोबत वेगवेगळ्या साथीदारांची मदत घेत होता. तो गुन्हेगारांना संघटीत करुन टोळीची दहशत व वर्चस्व वाढवण्यासाठी गुन्हे करत होता. पप्पू येणपुरे टोळीने दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत करणे, मारामारी, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे, दहशत माजवणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. पप्पू येणपूरे टोळीवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याच्या गुन्हेगारी वर्तनात काहीही फरक पडला नाही.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस प्रविणकुमार पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलिस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगांवकर करत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, परिमंडळ २ च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणीक, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गिरीश दिघावकर, सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप व्हटकर, सहायक पोलिस फौजदार चंद्रकांत माने, पोलिस अंमलदार नरेंद्र महांगरे, विशाल वारुळे आणि स्वप्नील बांदल यांच्या पथकाने केली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ११३ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.