पुणे : कसबा पेठेत दहशत पसरवून लुटमार करणाऱ्या अंकुश थोरात व त्याच्या साथीदारावर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी मोक्का कारवाई केली. अंकुश सूर्यकांत थोरात (वय २९, रा. ताडीवाला रोड, मूळ छत्रपती संभाजीनगर) आणि मिथुन शिवदास कांबळे (वय ३०, रा. ताडीवाला रोड) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
कसबा पेठेतील पवळे चौकात मेट्रो स्टेशनचे काम करणारे चहा पिऊन परत कामावर जात असताना अंकुश थोरात व कांबळे यांनी त्यांच्याशी भांडणे केली. त्यांना रिक्षात डांबून ठेवले. चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन मोबाइल फोन व फोन पेद्वारे पैसे ट्रान्सफर करून घेतले होते.
अंकुश थोरात याने प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळ्या साथीदारासह गुन्हे केले आहेत. पुणे शहर, पिंपरी व छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हेगारी कारवाया करून दहशत निर्माण केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे पाठविला. पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत ८७ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.