पुणे : दोन वर्षांपूर्वी पापडे वस्ती येथे केलेल्या खुनात पोलिसांना मदत केल्याच्या संशयावरून हॉटेलमध्ये येऊन तोडफोड करत वार करुन परिसरात दहशत माजवणाऱ्या तिरुपती उर्फ टक्या विठ्ठल लष्कर व त्याच्या अन्य ३ साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. याप्रकरणी टोळी प्रमुख तिरुपती उर्फ टक्या विठ्ठल लष्कर (२१, रा. पापड वस्ती, पुणे), शुभम सुरेश करांडे (२२, रा. हडपसर, पुणे), अथर्व रविंद्र शिंदे (२१ रा. साडेसतरा नळी, हडपसर) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन शुभम करांडे याला अटक केली आहे.
हडपसर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त आर राजा यांच्या मार्फत पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलिस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख या करत आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त आर राजा, सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले, सहायक निरीक्षक सारिका जगताप, उप निरीक्षक सुशील डमरे, निगराणी पथकातील पोलिस अंमलदार प्रवीण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद आणि गिरीश एकोर्गे यांच्या पथकाने केली. आतापर्यंत पोलिस आयुक्तांनी १०५ संघटीत टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.