पुणे : ग्राहक असलेल्या महिला वकिलाची डिलिव्हरी बॉयकडून झालेल्या विनयभंगाबाबतची तक्रार करुनही कंपनीची बदनामी टाळण्यासाठी कारवाई न करणाऱ्या स्विगीच्या मॅनेजरसह पाच जणांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी डिलिव्हरी बॉय, स्विगी डॉट कॉमच्या बंगळुरु मुख्य कार्यालयाचे व्यवस्थापक, पुण्यातील व्यवस्थापक तसेच अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २१ वर्षाच्या महिला वकिलाने डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका महिला वकिलाने स्विगी डॉट कॉमवर संपर्क साधून २४ जानेवारी रोजी एक ऑर्डर दिली होती. बीएमसीसी रोडवरील या महिला वकिलाच्या घरी रात्री पावणे दहा वाजता स्विगीचा डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला होता. ऑर्डर दिल्यानंतर त्याने फिर्यादींकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्या पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या. त्यावेळी त्याने अश्लिल वर्तन केले. पाणी घेऊन त्या पुन्हा बाहेर आल्या. तेव्हा त्याला त्या अवस्थेत पाहून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. झाल्या प्रकाराची त्यांनी स्विगी कंपनीच्या कस्टमर केअरला तातडीने फोन करुन कल्पना दिली. मात्र, कंपनीच्या व्यवस्थापकाने कंपनीची बदनामी होऊ नये, म्हणून कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या महिला वकिलाने न्यायालयात फिर्याद दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करावा व त्याचा अहवाल पाठविण्याचा आदेश डेक्कन पोलिसांना दिला आहे. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भागवत अधिक तपास करीत आहेत.
......................
ग्राहकांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाची : स्विगी कंपनीकडून भूमिका स्पष्ट
घडलेल्या प्रकाराबाबत आम्हाला कल्पना असून हा प्रकार लक्षात आल्याक्षणापासून आम्ही पोलिस प्रशासनाशी संपर्कात आहोत. स्विगीमध्ये ग्राहकांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची असून अशा प्रकारची वर्तणूक आम्ही कदापी ही खपवून घेत नाही. आमच्या वितरण भागीदाराचा आमच्या व्यासपीठाशी असलेला ऍक्सेस आम्ही काढून घेतला असून प्रशासनाला त्यांच्या तपासात शक्य त्या सर्व प्रकारे आम्ही मदत करण्यास कटिबद्ध आहोत.स्विगी आपल्या वितरण भागीदारांशी तत्वनिष्ठेतेच्या पातळीवर जोडलेली असते. प्रत्येक वितरण भागीदाराच्या पार्श्वभूमीची तटस्थ संस्थेच्या माध्यमातून कसून पडताळणी केली जाते. ओळख, पत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची खातरजमा केली जाते.