कळस : इंदापूर तालुक्यातील एका राजकीय पक्षाचा उपाध्यक्ष असलेल्या शिक्षकाने माध्यमिक विद्यालयातील अकरा अल्पवयीन विद्यार्थिनींची छेडछाड करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नावलौकिक असलेल्या विद्यालयामध्ये हा शिक्षक गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत. मागील काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलींची छेडछाड होत असल्याची माहिती आहे. भितीपोटी अल्पवयीन मुलींनी हा प्रकार सांगितला नाही. याची चर्चा परिसरामध्ये दबक्या आवाजात सुरु झाल्यावर संबंधित मुलींनी शाळेतील महिला शिक्षक व शाळेच्या प्राचार्याकडे हा प्रकार सांगितला. संबधित शाळेने शिक्षकाला निलंबित केले आहे. शाळेच्या प्राचार्यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाच्या विरोधात तक्रारी अर्ज दिला आहे. पोलिसांनी अर्ज आला असल्याचे सांंगितले आहे. संबंधित शिक्षक एका राजकीय पक्षाचा इंदापूर तालुक्याचा उपाध्यक्ष असून सध्या तो राजकारणामध्ये सक्रिय आहे. त्यामुळे राजकीय वजन वापरून हा प्रकार दडपण्याची शक्यता व्यक्त होत आहे.