राजगुरुनगर: पोलीस ॲकॅडमीत संस्थाचालकाकडून सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. वामन सुरेश गव्हाणे (वय ३७ गव्हाणे करियर ॲकॅडमीत संस्थापक, रा. ब्राम्हणअळी, राजगुरूनगर, ता खेड ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन खेड पोलिसांत विनयभंग, पोक्सो कायद्यासह इतर कलमानुसार गव्हाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पीडित मुलगी मुळची सोलापुर जिल्ह्यातील असून ती ३ मे २०२४ पासून गव्हाणे करियर ॲकॅडमीत भरतीपूर्व प्रशिक्षणाकरीता दाखल झालेली होती. बुधवारी (दि ११) संध्याकाळी इतर प्रशिक्षित मुलींबरोबर असताना पीडित मुलीला तिच्या आईचा फोन आला आहे. असे सांगून चालक गव्हाणे याने कार्यालयात बोलावून घेतले. ती आत आल्यावर फी जमा झाली नसल्याचे कारण सांगून स्वतःचा मोबाईल पाहायला सांगितले. मुलीने मोबाईल हातात घेऊन पाहायला सुरू करताच कार्यालयाचे दार आतून बंद करून गव्हाणे याने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याच वेळी एक प्रशिक्षणार्थी मुलगा कार्यालयाकडे त्याच्या कामासाठी धावत आला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला असा घटनाक्रम तक्रारीत नमूद केला आहे.
राजगुरुनगर शहरात तालुका क्रीडा संकुल येथे या ॲकॅडमीचे कार्यालय आहे. आरोपी गव्हाणे याच्या ॲकॅडमीमध्ये सुमारे १०० विद्यार्थी विद्यार्थिनी भरतीपूर्व शिक्षण घेत असून पीडित मुलीप्रमाणे आणखी काही विद्यार्थीनींसोबत अशा प्रकारचे कृत्य झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे याबाबत आरोपीकडे सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे खेड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल गुरव यांनी सांगितले.