पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडवत गैरवर्तन करणाऱ्या एका २७ वर्षीय भाई विरोधात पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. १६ वर्षीय मुलीला रस्त्यात अडवत ‘मी इथला भाई आहे, जो मध्ये येईल त्याला मारून टाकीन’ अशी धमकी देखील त्याने दिल्याचे पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पीडित मुलीच्या ३८ वर्षीय आईने पर्वती पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून आकाश मारुती शेलार (२७, रा. जनता वसाहत) याच्यावर विनयभंग आणि पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. २) दुपारी सव्वातीन ते साडेतीनच्या सुमारास जनता वसाहत येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहतात. फिर्यादी यांची १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आरोपीने वारंवार पाठलाग केला. तसेच तिला भररस्त्यात अडवून बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने त्याच्यासोबत बोलण्यास नकार दिला. मुलीने याबाबत घरी येऊन आईला सांगितले. त्यांनी आरोपीकडे याबाबत विचारणा केली असता, मी इथला भाई आहे, मला कोणी बोलायचे नाही, जो मध्ये येईल त्याला मी मारून टाकीन, मला तिच्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत फिर्यादी यांना देखील धमकी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुळीक या करत आहेत.