पुणे : कंपनीतील तरुणीकडे पैसे मागून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि ७००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गुलाने यांनी ही शिक्षा सुनावली.
इस्माईल अब्दुल रहेमान करजगी (वय ४२, रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिला व तिच्या पतीने हवेली पोलिस स्टेशन येथे जाऊन ६ फेब्रुवारी २०१० मध्ये आरोपी इस्माईल करजगी याच्या विरोधात तक्रार दिली. आरोपी इस्माईल करजगी व पीडित महिला एकाच कंपनीत २०१० मध्ये नोकरीला होते. आरोपी इस्माईल करजगी हा मोठ्या पदावर कार्यरत होता. पीडित महिला आरोपीच्या हाताखाली कर्मचारी म्हणून काम करत होती.
नोकरीच्या निमित्ताने ओळख झाल्यानंतर आरोपीने पीडित महिलेला काही पैसे उसने म्हणून मागितले. पीडित महिलेने वेळोवेळी त्याच्या खात्यात पैसे भरले होते. घटनेच्या दिवशी आरोपी इस्माईल करजगीने पीडितेला सांगितले की, त्याची एक मैत्रीण सिंहगड रोड येथील सदनिकेवर येणार आहे, तू पण चल असे खोटे बोलून पीडित महिलेला आरोपी घेऊन गेला. तिथे पिस्तूल दाखवली. आरडाओरडा केला तर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी देऊन बलात्कार केला. व्हिडिओ क्लिपिंग काढून सर्वांना पाठवण्याची धमकी दिली.
कुटुंबीयांना जीवे ठार मारीन अशी धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी पैसे उकळून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. याप्रकरणी हवेली पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केली. सरकार पक्षाने न्यायालयात एकूण ११ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या. पीडित महिलेच्या पतीची साक्ष अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवली. त्यानंतर केसची सुनावणी होऊन न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम ३७६ व कलम ५०६ (२) नुसार सात वर्षे सक्तमजुरीची व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या केसमध्ये सरकारी पक्षातर्फे ॲड. पुष्कर सप्रे व पीडितेच्या वतीने ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार, ॲड. अजय ताकवणे यांनी काम पाहिले. तपास अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक (निवृत्त) सतीश पाटील यांनी कामकाज पाहिले.