पुणे: अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीला टेकडीवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला २१ वर्षांची सक्तमजुरी व ७५ हजार रुपयांचा दंड लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) न्यायालयाने ठोठावला. विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला. आरोपी हा तडीपार असतानाही शहरात येऊन त्याने हे वाईट कृत्य केले. उच्चाप्पा लिंगाप्पा मंगळूर (वय ३०, रा. चिंचवड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित मुलीच्या वडिलांनी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना २ ऑक्टोबर २०१८ रोजी बिजलीनगर येथील टेकडीवर घडली. आरोपी उच्चाप्पाला तत्कालीन पुणे शहर आयुक्तालय व पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. मात्र, तो तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आला. पीडित मुलगी ही घरासमोर अंगणवाडीच्या मैदानात खेळत असताना आरोपीने तिला टेकडीवर नेत लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीसह प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने त्याची वासना शमविण्यासाठी हा घृणास्पद गुन्हा केला आहे. त्यामुळे पीडितेला शारीरिक व मानसिक धक्का बसला आहे. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता कोणतीही दयामाया न दाखविता त्याला कठोर शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केला. सरकार पक्ष व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली, तसेच पीडितेला भरपाई देण्याचे आदेश पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले. चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, हवालदार दिनेश बांबळे यांनी न्यायालयाच्या कामकाजात मदत केली.
अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; तडीपार असणाऱ्या नराधमाला २१ वर्षांची सक्तमजुरी
By नम्रता फडणीस | Published: August 21, 2024 6:38 PM