लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यापासून वाढत आहे. कोरोनाची लस निघाली असली तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरने हात धुवा, असे आवाहन होत आहे. जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून आई-बाबा, स्वतःसाठी अन् आमच्यासाठी मास्क वापरा हो ! स्वतःच्या जीवासोबत आमचाही जीव सुरक्षित ठेवा हो, अशी भावनिक साद घातली आहे.
गेल्या आठवडयापासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मास्क वापरणे, सॅनिटायझरने हात धुवा, घरातील ज्येष्ठांची काळजी घेणे याविषयी सर्वत्र बोलले जात आहे. त्यामुळे लहान मुला-मुलींना याविषयी चांगली माहिती झाली आहे. त्यामुळे मोठे आता बिनधास्त राहत असले, तरी हे लहानगे आता त्यांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत.
.. . . . . . .. . .. .. ..
कोरोना काळात सुट्टी न घेता आम्ही काम करतोय. घरी मुलं वाट बघत असतात. घरी गेल्यानंतर अंघोळ केल्या शिवाय मुलांना जवळ घेता येत नाही. पालकांनी देखील आपल्या मुलांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. परीक्षेचे दिवस जवळ आले आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान काही प्रमाणात झाले आहे. रुग्ण संख्या वाढत आहे. सर्व पालकांनी, नागरिकांनी मास्क वापरला पाहिजे.
-रेखा जाधव, वैद्यकीय अधिकारी, पुणे मनपा.
------------------
कोरोनामुळे अभ्यास ऑनलाइन शिकवला जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सांगितले आहे. आई-बाबा पण घराबाहेर जाताना मास्क आणि सॅनिटायझर वापरतात. बाहेरून घरी आले की, लगेच साबणाने स्वच्छ हातपाय धुतात. आमच्या घरातले सर्वजण काळजी घेतात.
- वेदिका स्वप्नील पायगुडे.
---------------------
कोरोनापासून बचाव करण्यासाठी आई-बाबा घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावूनच जातात. सोबत सॅनिटायझर असते. बाबा घरी आले की, आंघोळ करतात. मगच आमच्या जवळ येतात. मी ही मास्क वापरतो. घराबाहेर पडताना जर कोणी मास्क घ्यायचे विसरले, तर मी त्यांच्या हातात मास्क देतो.
- कविश कवठेकर
-----------------
टीव्हीवर कोरोना बद्दल माहिती दिली जाते. मी स्वतः घराबाहेर जाताना मास्क लावते. आईने जर मास्क लावला नाही, तर तिला लावायला सांगते. नाकाच्या खाली मास्क येणार नाही, याची काळजी घेते. साबणाने हात स्वच्छ धुते.
-श्रेया शेलार.
-----------------
आमच्या घरात काका, काकी, आई-बाबा, भाऊ, आजी-आजोबा असे एकत्रित राहतो. त्यामुळे आम्ही खूप काळजी घेतो. घराच्या जिन्यामध्येच सॅनिटायझर ठेवलेले आहे. आजी-आजोबांना कामाशिवाय घराबाहेर पडू देत नाही.
-रुद्र यादवडे.
---------
गर्दीमध्ये गेलो तर सुरक्षित अंतर पाळतो. सॅनिटायझर नेहमी सोबत ठेवलेले असते. आई-बाबा बाहेर पडत असताना त्यांनी सर्व सोबत घेतले आहे का, याची खात्री करतो.
-हर्षल डिंबळे.
-----------------
आई-बाबांनी मास्क लावले असेल तरच मी त्यांना बाहेर पडू देते. आजी आजोबा घरात असल्यामुळे आई-बाबा बाहेरून आले की ते लगेचच अंघोळ करतात. शेजारचे देखील काळजी घेतात. जर कोणी काळजी घेत नसले त्याला आम्ही समजावून सांगतो.
-मृणाली साळवे