लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आई, माझी शाळा कधी सुरू होणार गं? या चिमुकल्यांच्या प्रश्नांना काय उत्तर द्याव हेच आता पालकांना समजेनासे झाले आहे. मुलांसमोर शाळेचे चित्र रंगवून, आता तू शाळेत जाणार. मग तुझ्यासारखेच छोटे छोटे मित्र मैत्रिणी भेटणार असे सांगून चिमुकल्यांना शाळेसाठी तयार केले खरे; मात्र कोरोनामुळे शाळेचे दर्शनच त्यांना घडू शकलेले नाही. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे शाळेमधील बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकासाचे टप्पे पार करण्यापूर्वी शाळेची प्राथमिक ओळख मुलांना होणे खूप महत्त्वाचे असते. शिक्षक, त्यांच्याविषयीचा आदर, शिकणे, ऐकणे, आत्मसात करणे, शिस्त, एकत्रितपणे डबा खातानाचे बोलणे या सर्व संस्काराचे ‘बाळकडू’ शाळा या घटकाकडूनच मुलांना मिळते. परंतु, शाळेची पहिल्यांदाच पायरी चढणारी नर्सरी आणि केजीची चिमुकली मुले या शालेय वातावरणापासून वंचितच राहिली आहेत. कोरोनाच्या तिस-या लाटेचा मुलांना धोका असल्याचा इशारा देण्यात आल्याने शालेय प्रशासनांकडून शाळेचे दरवाजे उघडणार नसल्याचे संकेत पालकांना देण्यात आल्याने यंदाच्या वर्षी देखील शाळेच्या पहिलावहिल्या अनुभवापासून ही मुले मुकणार आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. ज्या पालकांनी नर्सरी आणि केजीसाठी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांच्या चिमुकल्यांना केवळ ‘शाळा’ हा शब्दच अवगत झाला आहे. अद्याप त्याचे दर्शन घडलेले नाही. पुण्यात नर्सरी आणि केजीच्या जवळपास हजाराच्या वर शाळा आहेत. बहुतांश शाळा या खासगी असल्यामुळे त्या सर्वांची नोंद शासनस्तरावर नसल्याचे सांगण्यात आले आहे. मुलांचा वेळ जावा, त्यांना नवीन गोष्टी शिकता याव्यात म्हणून पालक मुलांना दीड ते तीन वर्षे वयोगटातच नर्सरी, केजीमध्ये प्रवेश घेतात. १ ते ६ वर्षातच मुलांचा बौद्धिक विकास अधिक चांगल्या पद्धतीने होतो, असे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. सुरुवातीच्या वयातच मुलांना विविध गोष्टींचे ज्ञान देणे आवश्यक असते आणि ते देण्यासाठी ‘शाळा’ हेच उत्तम माध्यम असते. मात्र या चिमुकल्यांना शाळा कशी असते हे माहिती नाही. त्यांचे शालेय शिक्षण थेट आॅनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर ही मुले शालेय वातावरणात रूळू शकणार का? अशी चिंता पालकांना भेडसावू लागली आहे.
-------------------------------------------------------------------------------
शाळा म्हणजे काय?
मित्र-मैत्रिणी हे समजण्याचे त्यांचे हे वय आहे. माझ्या मुलीने कोरोना झाल्यानंतर मी शाळेत जाणारे, एकटी राहाणारे अशी मानसिक तयारी केली आहे. ते ती सारखी आम्हाला सांगत असते. ती शाळेत जायला खूप उत्सुक आहे. पण तिला जाता येत नाही. तिच्या चुलत बहिणीची मागच्या वर्षी आॅनलाइन शाळा होती. मग ती तिच्याबरोबर बसायची. आम्हीदेखील तिला खोटी खोटी आॅनलाइन शाळा लावून द्यायचो. तिला आता आॅनलाइन शाळा माहिती झाली आहे. त्यामुळे ती शाळा खूप मिस करत आहे. मी तिला घरी शिकविते. पण शाळेचा मुलांवरचा प्रभाव हा वेगळा असतो. शाळा बंद असल्यामुळे मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास थांबला आहे, असे वाटते.
- निकिता पारखी, पालक
------------------------------------------------------------------------------------------------
नर्सरी ते केजी या वयोगटातील मुलांना शाळा काय आहे हे अद्याप माहितीच नसल्यामुळे त्यांची मानसिकता वेगळी आहे. पण घरात तिच तिच माणसे सातत्याने दिसणे, घरात कोंडल्यासारखे आहोत असे वाटणे याचा मुलांवर नक्कीच परिणाम होतो. घरात चिडचिड, सातत्याने रागाने बोलणे असे जर पालक करीत असतील तर त्याचा परिणामदेखील मुलांवर निश्चितच होतो. आई-बाबा जसे वातावरण घरात निर्माण करतात. त्यावर त्यांची मानसिक जडणघडण होत असते. यासाठी पालकांनी मुलांशी त्याच त्याच विषयावर सातत्याने बोलता कामा नये. आर्थिक स्थिती, घरातील कुणी सदस्य निधन पावले असेल तर त्याची फारशी वाच्यता मुलांसमोर करता कामा नये. त्याचा मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. मुलांना कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत व्यस्त ठेवणे गरजेचे आहे.
- श्रृती पानसे, मानसोपचारतज्ज्ञ
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्व प्राथमिक शिक्षण हा मुलाच्या विकासाचा पाया आहे. हा पाया पक्का होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्ले ग्रुपपासून केजीच्या मुलांचेदेखील आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. शाळेच्या अॅपद्वारे मुलांना अॅक्टिव्हिटीज दिल्या जातात. यात मुलांबरोबर पालक आणि शिक्षक सहभागी होतात. मुले खूप लहान असल्याने त्यांना गोष्टी सांगणे, चित्र काढून घेणे अशा गोष्टी करून घेतल्या जातात. या मुलांनी अजून शाळा बघितलेली नाही. आॅनलाइन माध्यमातून मुलांनी शाळेचा श्रीगणेशा करावा, अशी पालकांची इच्छा नव्हती. एक वर्ष असे काढू शकतो अशी पालकांची मानसिकता होती. पण आता शाळा कधी सुरू होतील हे माहिती नसल्यामुळे पालकांनी आणि मुलांनी देखील आॅनलाइन शिक्षणाला स्वीकारले आहे. शाळेत वेगळ्या माध्यमातून शिकविले जाते पण आॅनलाइनद्वारे हा अनुभव देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. हेही खरे आहे की शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना काहीसे अवघड जाणार आहे. कारण आॅनलाइन माध्यमातूनच त्यांना शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींना भेटण्याची सवय झाली आहे.
- कमल शहानी, इयूरो किडस प्री-प्रायमरी स्कूल, कोंढवा
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------