लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या सोमवारी (दि. २५) सकाळी होणार आहे. कोरोना, लाॅकडाऊन आणि त्यानंतरच्या शिक्षक, पदवीधर आणि नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तब्बल एक वर्ष ही बैठक होऊ शकली नव्हती.
जिल्ह्याचा विकास व राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीला विशेष महत्त्व आहे. पालकमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीला सन २०२०-२१ या वर्षात साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापूर्वीची बैठक १७ जानेवारी २०२० रोजी झाली होती.
राज्यात नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक होणे अपेक्षित होती. परंतु, पालकमंत्री निश्चित होण्यात वेळ गेला व त्यानंतर मार्च महिन्यात राज्यावर कोरोनाचे संकट आले. यामुळे बैठकीवर निर्बंध आले. त्यानंतर एकापाठोपाठ निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्या.
पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल एक वर्षानंतर सोमवारी होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत प्रामुख्याने सन २०१९-२० या वर्षाच्या खर्चाला मान्यता देणे, सन २०२०-२१ च्या खर्चाचा आढावा घेणे, चालू वर्षांच्या खर्चाचे पुनर्नियोजन करणे, सन २०२१-२२ च्या खर्चाच्या आराखड्यास मंजुरी देणे ही प्रशासकीय कामे प्राधान्याने होतील. यंदाचा निधी हा प्रामुख्याने विकासकामांऐवजी कोरोना आपत्तीच्या निवारणातच अधिक प्रमाणात खर्च झाला आहे. त्याचाही आढावा बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.