गटारे गाडल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
खोडद : नारायणगाव खोडद रस्त्यावरील खड्डे बुजवायला सार्वजनिक बांधकाम विभागाला अखेर मुहूर्त मिळाला असून मंगळवारी हे खड्डे मुरूम टाकून बुजवायचे काम सुरू झाले. खोडद येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश यांनी हे खड्डे बुजविण्यासाठी पाठपुरावा केला होता.
नारायणगाव-खोडद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. हे खड्डे तत्काळ बुजवावेत तसेच साईडपट्ट्या भराव्यात आणि संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी खोडद येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती.
सुमारे दोन वर्षांपूर्वी नारायणगाव खोडद रस्त्याचे काम झाले होते. रस्त्याच्या बाजूची मातीने गाडलेली गटारे यावेळी मोकळी केली गेली नाहीत. आता सध्या पाऊस सुरू आहे. बाजूची गटारे गाडलेली असल्याने पावसाचे पाणी आता थेट रस्त्यावर येत आहे. यामुळे या रस्त्यावरून पाणी वाहते. या कामाबाबत खोडद व हिवरे तर्फे नारायणगाव येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खोडदचे ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता वाय. जी. मळेकर यांना या रस्त्याची झालेली दुरवस्था प्रत्यक्ष दाखवून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करून याबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच बाजूची गटारे मोकळी करून ठिकठिकाणी पाणी रस्त्यावर येणार नाही, अशी व्यवस्था करणे अपेक्षित होते पण या कामांकडे दुर्लक्ष केल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी हा डांबरी रस्ता फुटला गेला असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्याच्या या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा दुचाकी या खड्ड्यांमध्ये जाऊन आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. अनेकदा हे खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात चुकीच्या बाजूने जाऊन अपघात झाले आहेत. या रस्त्याच्या कामाचा दर्जा व रस्त्यावर पडलेले खड्डे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गांभीर्याने लक्ष देतील का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
"नारायणगाव - खोडद रस्त्यासाठी खोडद व हिवरे ग्रामस्थांनी अनेक वर्षे संघर्ष केला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता झाला आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने या रस्त्यावर नेहमीच मोठमोठे खड्डे पडत आहेत. रस्त्याच्या साईडपट्ट्यादेखील चांगल्या पद्धतीने न भरल्याने अपघातांचा धोका अधिक वाढला आहे. रस्त्याच्या बाजूची गाडलेली गटारे मोकळी करणे गरजेचे आहे."
योगेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, खोडद
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता वाय. जी. मळेकर यांना योगेश शिंदे यांनी निवेदन देऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली.