पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी न जमल्यास पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते. दुकानातून गणपतीची मूर्ती ८-१५ दिवस आधी आणून घरामध्ये ठेवता येते. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राचे दिवशी गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. अनेकांकडे गौरीपुढे नैवेद्य दाखवून ताट दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे. मात्र, कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो, असेही दाते यांनी सांगितले.
घरामध्ये गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थांची मूर्ती नसावी.
-----------------
गणेशोत्सवातील महत्वाचे दिवस
१० सप्टेंबर रोजी पहाटे ४.५० वाजल्यापासून दुपारी १.५० पर्यंत गणेश प्रतिष्ठापना
१२ सप्टेंबर, रविवारी सकाळी ९.५० नंतर परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
१३ सप्टेंबर, सोमवार गौरी पूजन
१४ सप्टेंबर, मंगळवार गौरी विसर्जन - सकाळी ७.०५ नंतर गौरी विसर्जन करावे. मंगळवार असला तरीही गौरीविसर्जन परंपरेप्रमाणेच करावे.
१९ सप्टेंबर, रविवार अनंत चतुर्दशी