पुणे : अकरा महिने कोरोनाशी दोन हात केल्यानंतर अखेर लसीकरणाचा टप्पा प्रत्यक्ष पार पडला. सातत्याने रुग्णसेवेत व्यस्त असलेल्या आणि ताणाखाली असलेल्या डॉक्टरांच्या दृष्टीने लसीकरणाचा क्षण अभिमानास्पद ठरला. आरोग्य कर्मचारी लस घेत असतील तर सामान्य माणसाचा नक्कीच विश्वास बसेल, अशा प्रतिक्रिया डॉक्टरांनी व्यक्त केल्या.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर म्हणाले, ‘लसीकरणाचा पहिला दिवस यशस्वीरित्या पार पडला. यादीमध्ये नाव असलेल्या सर्वांना कालच निरोप देण्यात आला होता. शासनातर्फेच ही यादी तयार करण्यात आली होती. लसीकरण संपूर्ण समाजासाठीच गरजेचे आहे. गेले नऊ-दहा महिने सुरु असलेल्या लढाईचा शेवट जवळ येतोय आणि ही लढाई आपण जिंकत आहोत, याचे समाधान वाटत आहे.’
----------------------
एका वर्षात लस तयार करुन आपल्यासाठी उपलब्ध झाली, ही देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. लस नसताना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कोरोनाच्या १२,००० रुग्णांवर उपचार करण्यात आले. या काळात एकमेकांना बळ दिले. आता लसीच्या रुपाने वैैज्ञानिक बळ मिळाले आहे. त्यामुळे अधिक उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.लस ऐच्छिक आहे. ५०-१०० वर्षांपूर्वी लहान मुलांसाठी लसी उपलब्ध झाल्या तेव्हा लस घेतल्याने देवाचा कोप होईल, लस घेणे धर्माविरुध्द आहे, असे गैैरसमज पसरवणारे लोक होते. आजही लसीमुळे त्रास होईल, अशा अफवा पसरवणारे लोक आहेत. मात्र, संपूर्ण संशोधनाअंती सुरक्षित लस आपल्या हाती आली आहे. त्यामुळे अविश्वास दाखवण्यात अर्थ नाही.
- डॉ. समीर जोग, केंद्रप्रमुख
----------------------
लहान मुलांचे आजार लसींमुळे आटोक्यात आले. लसीच्या रुपाने आपल्याला नवसंजीवनी मिळाली आहे. अनेक शास्त्रज्ञ, डॉक्टरांनी एकत्र येऊन काम केल्याने लस कमी वेळात उपलब्ध झाली आहे. आरोग्य कर्मचा-यांनी लस घेतल्यावर सामान्य माणसांचा नक्कीच विश्वास बसेल.
- डॉ. राजन जोशी, बालरोगतज्ज्ञ