लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ‘गीतरामायण’ अजरामर करणारे गजानन दिगंबर माडगूळकर ऊर्फ गदिमा यांच्या पुण्यातील स्मारकाच्या उभारणीला अखेर मुहूर्त लागला आहे. सोमवार (दि.२२) सकाळी ९ वाजता कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन माडगूळकर कुटुंबीयांसह केवळ २५ जणांच्या उपस्थितीत स्मारकाच्या कोथरूड येथील नियोजित जागेवर छोटी पूजा करून गदिमांच्या स्मारकाच्या कामाचा श्रीगणेशा होणार आहे.
पुण्यात स्मारक होण्यासाठी गदिमांच्या कुटुंबीयांनी अनेक वर्षे लढा दिला. त्याला आता खऱ्या अर्थाने यश मिळत आहे. गदिमा यांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी स्मारक होण्यासाठी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर कोथरूडच्या महात्मा फुले सोसायटीमध्ये स्मारकासाठी जागा दिली आणि गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षातच स्मारक उभे राहील, अशी घोषणाही केली. मात्र, गदिमांची १०१ वी जयंती आली तरी काही हालचाली होत नव्हत्या. साहित्य क्षेत्रातील मंडळींनी गदिमांच्या पुण्यतिथीदिनी (१४ डिसेंबर) आंदोलनाचा नारा दिला. मात्र त्यापूर्वीच स्मारकाच्या निर्धारित जागेवर एक ते दोन महिन्यांत भूमिपूजन करणार असल्याची जाहीर घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली.
महापौरांनी आश्वासन दिल्याप्रमाणे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार होता. उद्घाटक म्हणून कुणाला आमंत्रित करायचे याबाबत मान्यवरांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता. मात्र, कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे महापौरांनी स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा पुढे ढकलला. केवळ छोटेखानी कार्यक्रमातून स्मारकाच्या कामाला सुरुवात करू असे, गदिमा कुटुंबीयांना महापौरांकडून सांगण्यात आले. पुण्यात गदिमांचे आदर्श स्मारक उभारून ही वास्तू पुण्याची शान ठरावी, असे गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी सांगितले.
कोट
कोरोना संसर्गाच्या मर्यादेमुळे जास्तीत जास्त गदिमाप्रेमींना या आनंदात सहभागी करून घेता येणार नाही, याबद्दल खंत नक्कीच राहील. पण शेवटी स्मारकाचे काम लवकर सुरू होणे यातच गदिमा प्रेमींना आनंद आहे व येत्या दोन वर्षांत सर्व पुणेकरांच्या सहकार्याने एक आदर्श वास्तू उभी राहील, अशी आशा वाटते.
- सुमित्र माडगूळकर, गदिमांचे नातू