लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या आठ दिवसांपासून पुण्याला मिळत असलेला दिलासा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्या सोमवारी नोंदवली गेली. आज दिवसभरात २,५३८ नवे रुग्ण सापडले आहेत. आणखी एक दिलासा म्हणजे नव्याने बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अठराशेने जास्त आहे.
शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचा वाढता आकडा हा शहरासाठी मोठा दिलासादायक आहे़ गेल्या कित्येक दिवसांनंतर शहरातील नव्या कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडाही तीन हजारांच्या आत आला आहे़ आज दिवसभरात नव्याने २ हजार ५३८ कोरोनाबाधित आढळून आले असून, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ४ हजार ३५१ इतकी आहे़ यापूर्वी २९ मार्च रोजी कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांपेक्षा कमी होती.
सोमवारी दिवसभरात १६ हजार ११२ जणांनी तपासणी केली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १५़७५ टक्के इतकी आहे़ दिवसभरात ७० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १४ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६२ टक्के इतका आहे़
शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ६३० कोरोनाबाधित रूग्ण हे आॅक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३७१ रूग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत २० लाख ५० हजार १६३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख २ हजार ६५५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ३ लाख ४८ हजार ६८१ कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ४७ हजार ४२० इतकी झाली आहे़
---------------------------------