पुणे: ‘तुमच्या खात्यावर माझ्याकडून चूकून पैसे आले आहेत. ते माझया वैयक्तिक बॅंक खात्यावर पाठवा, असे सांगून ससूनमधून बारामती वैदयकीय महाविदयालयात बदली झालेल्या वरिष्ठ लिपिकाने ससूनमधील काही कर्मचा-यांना जाळयात ओढले. त्यावेळी त्या कर्मचा-यांनी विश्वास ठेवून पैसे परतही केले. मात्र, त्याची तक्रार न केल्याने आज ते या प्रकरणात अडकले असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. तर काहींनी चिरीमिरीच्या बदल्यात हे पैसे पुन्हा त्यांच्या खात्यांवर पाठवले, अशी माहीती ससूनमधील सूत्रांनी दिली.
ससून रुग्णालयात ४ काेटी १८ लाखांचा अपहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले असून त्यामध्ये प्रमुख आराेपी हे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने तसेच ससून रुग्णालयातून बारामती वैदयकीय महाविदयालयात बदली झालेला वरिष्ठ लिपिक सचिन ससार हे दाेघे मास्टरमाइंड असल्याचे बाेलले जात आहे. त्यापैकी ससार व इतराने अनेकांच्या खात्यांवर तीन ते ५७ लाखांच्या दरम्यान पैसे पाठवले आणि ते पुन्हा त्यांच्याकडून वैयक्तिक खात्यांवर ट्रान्सफर करायला लावल्याचे उघडकीस आले आहे. अनेकांकडे त्याबाबत बॅंकेचे स्टेटमेंटही आहे.
चूकून आले पैसे सांगायचे अन परत घ्यायचे
वरिष्ठ लिपिक हे पैसे वेगवेगळया खात्यांवर आधी पाठवायचे. नंतर त्यांना फाेन करून सांगायचे की ते पैसे चूकून आले असून पुन्हा वैयक्तिक खात्यावर पाठवा. तर काहींना त्यातले काही पैसे स्वत:साठी ठेवून घ्या आणि उरलेले पैसे पाठवा असेही आमिष दाखवून जाळयात ओढले गेले. अशा प्रकारे काेटयावधी रूपये पुन्हा घेतले. नेमके किती घेतले ते तपासात समाेर येईल. परंतू, या प्रकरणात प्रमाणिकपणे काम करणारे अडकले असल्याची चर्चा आहे. त्या सर्वांचे निलंबन झाले आहे.
पीएफ खात्यातील हाेते पैसे
हे पैसे ससून रुग्णालयातून १९८६ पासून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांचे आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर सहावा, सातवा वेतन आयोगाचा जमा झालेल्या फरकाचे तसेच महागाई भत्त्याचे आहेत. याचा फरक पूर्वी ससूनमध्ये जमा व्हायचा. परंतू, त्या कर्मचा-यांना याबाबत कळवण्यात आले नाही. ती रक्कम वर्षानुवर्षे पडून हाेती. त्या पैशांवर हा डल्ला मारण्यात आला. आता आधार क्रमांक जाेडल्याने कर्मचा-यांच्या खात्यात जमा होतो.
तीस काेटींचा घाेटाळा?
सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार हा घाेटाळा केवळ सव्वाचार काेटींचा नसून जवळपास तीस काेटींचा असल्याचे सांगितले जात आहे. मग, ही रक्कम कमी का दाखवली जात आहे? यातून काेणाला वाचवले जात आहे? या प्रकरणात निष्पक्षपणे चाैकशी हाेणार का हे देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.