लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोविड लसीबाबत ऑनलाइन माहिती घेताना आणि ऑनलाइन शॉपिंग करताना झालेल्या फसवणुकीत सायबर पोलिसांनी त्वरित प्रयत्न केल्याने तक्रारदारांना आठ लाखांची रक्कम परत मिळण्यात यश मिळाले. त्यामुळे यापुढील काळात नागरिकांनी कोणाच्याही सांगण्यावरून मोबाइल क्लोन ॲप डाऊनलोड करू नका, कोणतीही अनाधिकृत लिंक ओपन किंवा शेअर करू नका. तसेच मोबाइलवरून आलेला ओटीपी, क्रेडिट, डेबिट कार्ड नंबर कुणालाही शेअर करू नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
बाणेर येथील एका शिक्षकांना विमान प्रवास करायचा होता. प्रवासासाठी करोना चाचणी आवश्यक आहे का ? याबाबतची माहिती घेताना काही दिवसांपूर्वी त्यांची २ लाख ४० हजारांची फसवणूक झाली होती. धानोरीतील एका संगणक अभियंत्याची १ लाख ९३ हजार रुपये, कोथरूड येथील व्यावसायिकाची दीड लाख रुपये आणि बिबवेवाडीतील एका ज्येष्ठ नागरिकाची १ लाख २५ हजारांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकरणात फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी त्वरीत सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांनी त्वरीत कार्यवाही केली. तक्रारदारांच्या बँक खात्यातून लांबविण्यात आलेली रक्कम चोरट्यांच्या खात्यात जमा होणार होती.
ॲपद्वारे ऑनलाइन रक्कम हस्तांतरित करणाऱ्या कंपनीतील अधिकाऱ्यांबरोबर गवारी यांनी संपर्क साधून चोरट्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम थांबविली. पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे वेगवेगळ्या प्रकरणातील तक्रारदारांना आठ लाख रुपये परत मिळाले. तक्रारदारांनी फसवणूक झाल्यानंतर लगेचच तक्रार केली. त्यामुळे पोलिसांना त्वरीत कार्यवाही करणे शक्य झाले. पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक आयुक्त मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, उपनिरीक्षक गवारी, शुभांगी मालुसरे, स्वाती सावंत यांनी ही कारवाई केली.