कामशेत : नाणे मावळातील काही भागांमध्ये मागील पाच ते सहा दिवसांपासून पट्टेरी वाघ आल्याची चर्चा व शिरोता धरणाच्या भिंती शेजारी झुडपात बसलेला वाघाचा फोटो सोशल मीडियावर पाठवला जात आहे. मात्र हा पट्टेरी वाघ नसून, बिबट्या असल्याचे काही स्थानिक सांगत आहेत़ सांगिसे, खांडशी, नेसावे, उंबरवाडी या भागांत बिबट्याला पाहण्यात आल्याचे व एका कुत्र्याचा फडशा पडल्याचे कळते. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
शिवाय आपल्या जनावरांकडे विशेष लक्ष देत आहेत. तर काही ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून गस्त ही घातली जात आहे. याविषयी वन विभागाचे वन क्षेत्रपाल संजय मारणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त गेली पाच ते सहा दिवस सुरू आहे. मात्र बिबट्या निदर्शनास आला नाही. आम्ही या भागात कॅमेरा बसवणार असून, त्याच्या मार्फत बिबट्याचा शोध घेणार आहे.मावळ तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र असून, येथे मोठी जंगले आहेत. या जंगलात वन्य प्राण्यांचे मुख्य निवासस्थान आहे. परंतु वाढत्या शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, हळूहळू ओसाड होणारे डोंगर, वाढत्या शिकारी, जंगलातील नागरिकांचा वाढता वावर आदी महत्त्वाच्या कारणांसह जंगलातील संपत चाललेले पाण्याचे स्रोत, जंगलातील धोक्यात येत असलेला प्राण्यांचा निवारा आदी कारणांमुळे जंगलातील वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागल्याच्या घटनांमध्ये काही वर्षात वाढ झाली असून, तसेच स्थानिक नागरिक, पाळीव प्राणी, शेती आदींना धोका निर्माण होऊ शकतो़ याला जबाबदार कोण असा प्रश्न पर्यावरण प्रेमी व प्राणी मित्र संघटना उपस्थित करत आहे.
मावळ तालुक्यातील नाणे, पवन, अंदर मावळामध्ये मोठी धरणे असून, नाणे मावळात शिरोता व वडिवळे, पवन मावळात पवना, अंदर मावळात आंद्रा आदी धरणे व छोटे मोठे तलाव, नद्या व इतर जलाशय आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात वनराई व दाट जंगले आहेत. या भागांमध्ये अनेक लहान मोठी गावे वाड्यावस्त्या असून, येथे वास्तव्य करणाºया सर्वांचाच उदरनिर्वाह हा शेती व शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. यात शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन आदी तसेच शेतीत प्रामुख्याने भात, गहू, विविध कडधान्य व अनेक खरीप हंगामातील पिके घेतली जातात.मानवनिर्मित कारणनैसर्गिक कारणांबरोबरच मानवनिर्मित कृत्रिम कारणांमुळे वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला असून, या प्राण्यांमुळे शेतीचे तर नुकसान होतच आहे, शिवाय पाळीव प्राण्यांवरती हल्ले वाढले आहेत. जनावरांना रानात चरावयास सोडणे धोकादायक झाले असून, अनेक गावातील नागरिकही रात्री उशिरा बाहेर पडण्यास घाबरत आहेत. दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१६ मध्ये बिबट्याने नाणे मावळातील भाजगाव येथे दोन शेळ्या, साई येथे वासरू व इतर पाच पाळीव प्राणी व इतर अनेक प्राण्यांचा फडशा पडला होता. तर जानेवारी २०१७ मध्ये ताजे गावाच्या जवळ एका आश्रमात कुत्र्यावर हल्ला तसेच उंबरवाडी येथील डोंगर पठारावरील धनगर वस्तीजवळ बिबट्याचा वावर होता.
वृक्षतोडीमुळे जंगले ओसाडमावळातील वाढत्या शहरीकरणाचा फटका अनेक ग्रामीण व दुर्गम भागांमधील गावांनाही बसला असून, मोठ्या प्रमाणात केली जाणारी वृक्षतोडीमुळे जंगले ओसाड होत चालली आहेत. याच प्रमाणे गौण खनिज माती, मुरूम व डबर आदींचे अनेक व्यावसायिक सरकारी विभागांच्या अधिकाºयांच्या संगनमताने होत असलेले बेसुमार उत्खनन यामुळे मावळातील अनेक टेकड्या नामशेष झाल्या असून,डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच जळणासाठी व इतर व्यावसायिक अनेक कारणांसाठी जंगल व परिसरातील वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणात वाढली असून, वन विभागाचे याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे.