पुणे : राज्य सरकारच्या थेट लाभ हस्तांतर योजना राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होतील. वैयक्तिक लाभाच्या अशा ३१ योजनांच्या बाबतीत हीच पद्धत राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.सन २०१७-१८ चे अंदाजपत्रक सादर करताना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही माहिती दिली. राज्य सरकार ही योजना राबवण्याबाबत आग्रही आहे. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षापासून याच पद्धतीने सर्व योजना राबवण्यात येणार आहेत. शिक्षण मंडळातील अनेक योजनांमधील वस्तुंच्या खरेदीवरून वाद होत होते. निविदांमध्ये फेरफार, फेरनिविदा, साहित्याचा दर्जा चांगला नसणे, निविदा मंजूर होताना दाखवलेले साहित्य व प्रत्यक्ष वितरण करताना दाखवलेले साहित्य यात तफावत असणे, असे बरेच प्रकार यात होत होते. त्या सगळ्याला या थेट लाभ हस्तांतर योजनेमुळे आळा बसेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.समाजविकास तसेच अन्य काही विभागांमध्ये अशा वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यात येतात. अशा एकूण ३१ योजना आहेत. त्या सर्व योजनांमध्ये आता यापुढे हीच पद्धत राबवण्यात येईल. त्यामुळे त्यात होणाऱ्या गैरप्रकारांना लगाम बसेल असे आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी) 1 पालकांनी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे गणवेश किंवा ज्या कारणासाठी ते दिले आहेत त्यासाठी वापरलेच नाही तर काय या प्रश्नावर आयुक्तांनी तसे होणार नाही, याची काळजी तंत्रज्ञानाच्या साह्याने घेता येईल, असे सांगितले. 2पैसे खात्यात जमा करण्याऐवजी स्वाईप कार्ड देणे, हे कार्ड फक्त त्याच कारणासाठी वापरले जाईल, याची व्यवस्था करणे, असे बरेच काही यात करता येणे शक्य आहे. फक्त विद्यार्थ्यांच्या योजनांसाठीच नाही तर वैयक्तिक लाभाच्या अशा कोणत्याही योजनेसाठी ही व्यवस्था करता येईल, असे ते म्हणाले.
गणवेशाचे पैसे आता विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये
By admin | Published: March 31, 2017 3:04 AM