लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठे ज्वेलर्सचे बळवंत मराठे यांना नीलेश शेलार आणि दीप्ती काळे यांनी बेकायदेशीर सावकारीतून पैसे दिले आहे. त्याच्या व्याजापोटी त्यांनी पैसे आणि सोने जबरदस्तीने घेऊन गेले होते, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दीप्ती सरोज काळे (रा. उत्तमनगर) आणि नीलेश उमेश शेलार (रा. मानकर रेसिडेन्सी, कोथरूड) यांना अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने नीलेश शेलार याला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. न्यायालयाच्या लेखी आदेशान्वये दीप्ती काळे हिला पोलिसांनी मध्यरात्री पावणे दोन वाजता घरातून अटक केली. काळे हिला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले असताना सायक्लोफामच्या २ ते ३ गोळ्या खाल्ल्याने त्यांना चक्कर येत होती. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडी मागितली होती.
दीप्ती काळे यांच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात यापूर्वी खंडणी, खुनाचा प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. काळे व शेलार यांनी मराठे यांच्या घरी तसेच दुकानात जाऊन बेकायदेशीर सावकारीचे धंद्यातून गुंतवलेल्या पैशावरील व्याजाच्या रक्कमेची मागणील्रून पैसे दिले नाहीत तर तुम्हाला बघून घेईल, असे धमकावले होते. आरोपीच्या वतीने अॅड. तोसीफ शेख, अॅड. क्रांती सहाणे, अॅड. सूरज जाधव व इतरांनी काम पाहिले.
नीलेश शेलार याने मराठे यांच्या दुकानात प्रवेश करुन बेकायदेशीर सावकारीचे धंद्यातून दिलेल्या पैशांचे व्याजापोटी खंडणी म्हणून रुपये आणि सोने घेऊन गेलेला आहे. ते हस्तगत करायचे आहे. शेलाराने धमकी दिल्याचे व्हॉईस रेकॉडिंग उपलब्ध आहे. शेलार याचा व्हॉईस सॅम्पल घेऊन तो न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवायचा आहे. नीलेश शेलार याने सावकारीतून दिलेल्या पैशाच्या व्याजाची मागणी करून मानसिक त्रास दिलेला आहे. त्याबाबत तपास करायचा आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे इतर व्हाईट कॉलर गुन्हेगारांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे, त्याचा तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली़.