लोणावळा : खंडाळा परिसरात मागील दीड ते दोन महिन्यांत सतत कोणाला ना कोणाला चावत जखमी करणाऱ्या माकडाला पकडण्यात रविवारी (दि. १) वनविभाग व शिवदुर्ग मित्राच्या टिमला यश आले आहे.
खंडाळा परिसरात दोन महिन्यांपासून या माकडाने हैदोस घातला होता. गिरिजा हॉटेल, आयसीआयसीआय लर्निंग होम, दगडी बंगला या परिसरात सुरक्षा रक्षक तसेच गेस्ट व टू व्हिलरवर येणाऱ्या लोकांना पाडून ते माकड चावले होते. सुमारे २८ जणांना ते चावल्याची शक्यता खंडाळा भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
मागील पंधरवड्यात तसेच त्यापूर्वी दिवसाआड वन विभागाने व शिवदुर्ग टिमने सदरच्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते काही खासगी बंगल्यांमध्ये जात असल्याने हाती लागले नव्हते. मात्र नागरिकांमध्ये त्याची निर्माण झालेली दहशत व होत असलेले आक्रमण यामुळे त्याला पकडणे गरजेचे झाले होते. रविवारी सकाळी वनखात्याने विनंती केल्यानंतर शिवदुर्ग मित्र लोणावळा, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व वनखात्याने संयुक्तपणे मोहीम राबवत माकडाला जेरबंद केले. माकड जेरबंद झाल्याने खंडाळा भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. खंडाळा वन विभागाचे वनपाल सागर चुटके, रेस्क्यू तुहिन सातारकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.