रावणगाव : रावणगाव (ता. दौंड) येथे बुधवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिरासमोर विजेच्या धक्क्याने नरजातीच्या एका वानराचा मृत्यू झाला. त्याची खबर प्रा. रमेश आटोळे यांनी रावणगावचे सरपंच धनाजी आटोळे यांना देताच ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वानराच्या अंत्यविधीसाठी लागणारे सर्व साहित्य रावणगाव ग्रामस्थांनी त्वरित गोळा केले आणि मारुतीला नारळ फोडून भगव्या कापडात वानराला गुंडाळून जय श्रीरामच्या घोषात अतिशय दु:खद वातावरणात अंत्ययात्रा काढून पुरोहिताच्या हस्ते विधी करून एका मोठ्या खड्ड्यामध्ये दफन करण्यात आले.त्यानंतर श्लोक म्हणून ग्रामस्थांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. विशेष म्हणजे वानराची अंत्ययात्रा दफनविधीसाठी घेऊन जात असताना या अंत्ययात्रेमध्ये माकडेदेखील मोठ्या प्रमाणावर आपोआपच सहभागी झाली होती. या अंत्ययात्रेमधे ग्रामस्थ दत्तात्रय नाळे, रामचंद्र आटोळे, महेश आटोळे, बबन गाढवे, छबन कांबळे, विजय दिवटे, तुकाराम आटोळे, सुनील आटोळे, दीपक चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.
...अन् अंत्ययात्रेत माकडंही झाली सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 1:47 AM