पुणे : पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आता मान्सूनची आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सून यंदा सहा ते सात दिवस आधीच म्हणजेच २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, आता त्याचा प्रवास थंडावला असून येत्या दोन दिवसांत मान्सून हा दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, कौमारिनचा प्रदेश, दक्षिण पूर्व तसेच मध्य व ईशान्य बंगालचा उपसागर येथे पोचण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तो २७ मे रोजी केरळ दाखल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मान्सून हा दक्षिण पश्चिम बंगाल व केरळमध्ये एकाच वेळी दाखल होतो. मात्र, सध्याच्या त्याच्या वाटचालीनुसार तो आता २७ मे रोजी केरळमध्ये येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा पुढील प्रवासही रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, ‘केवळ पाऊस झाल्याने मान्सून आला, असे म्हणता येणार नाही. त्यासाठी काही निकष आहेत. त्यात वातावरणाच्या वरील भागातील पश्चिमी वारे हे खालच्या स्तरातील वाऱ्यांसोबत एकत्र आले पाहिजेत, त्यांचा वेग किमान ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असायला हवा, तसेच केरळमधील १६ केंद्रांपैकी किमान ६० टक्के केंद्रावर किमान २.५ मिलिमीटर पाऊस झाला पाहिजे. या निकषांवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. सध्या मान्सून येत्या दोन दिवसांत अरबी समुद्र व बंगालच्या उपसागर पुढे सरकण्याची शक्यता आहे.’
चार दिवसांचा फरक शक्य-
देशाच्या मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्ये व ईशान्य बंगालच्या उपसागरात एकाचवेळी दाखल होतो. मात्र, काही मॉडेलनुसार त्याचा प्रवास काहीसा थंडावला आहे. त्यामुळे तो हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार २७ मे रोजी दाखल होणार नाही. याच अंदाजानुसार तो चार दिवस आणखी लांबू शकतो, असे या विभागातील सूत्रांनी सांगितले. सध्या मान्सूनसाठीचा प्रवाह क्षीण झाला आहे. तो सशक्त झाल्यावर त्याचा प्रवास वेगाने होईल, असेही या सूत्रांनी सांगितले.