Monsoon 2022 | मान्सूनची वाटचाल अडखळतच, येत्या दोन दिवसांत दक्षिणपूर्व अरबी समुद्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 08:26 AM2022-05-27T08:26:47+5:302022-05-27T08:27:30+5:30
हवामान विभाग मान्सूनच्या केरळमधील वाटचालीवर लक्ष ठेवून...
पुणे : हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केलेल्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये २७ मे रोजी दाखल होणार होता. मात्र, तो पुढील दोन दिवसांत दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, कौमारिनचा प्रदेश, दक्षिण पूर्व, तसेच मध्य व ईशान्य बंगालचा उपसागर येथील आणखी काही भागांत पोहोचण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे, तसेच हवामान विभाग मान्सूनच्या केरळमधील वाटचालीवर लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या चोवीस तासांत कोकण-गोवा, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, तर मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. याबाबत हवामान विभागाचे डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, ‘अरबी समुद्रावरून पश्चिमी वारे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग व मराठवाड्यात काही प्रमाणात बाष्प घेऊन येत आहे, तर विदर्भाच्या काही भागात वाऱ्यांच्या अडथळ्यांमुळे काही प्रमाणात बाष्प येत आहे. त्यामुळे राज्यात येत्या चार दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरच्या दोन दिवसांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात तीन दिवसांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवस हवामान कोरडे राहील,
तर पुणे व जिल्ह्यात पुढील पश्चिमी वाऱ्यांमुळे दुपारनंतर व संध्याकाळी हवामान ढगाळ राहील. त्यामुळे तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी कमी राहण्याची शक्यता राहील. पुण्यात गुरुवारी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील चार दिवसांत पुण्यात तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे, तर सकाळच्या वेळी आकाश निरभ्र, तर दुपारनंतर ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.