Monsoon 2022 | मान्सून ३० जूनपर्यंत केरळमध्ये धडकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 01:21 PM2022-05-28T13:21:07+5:302022-05-28T14:04:32+5:30
सध्याची परिस्थिती अशीच अनुकूल राहिल्यास मान्सून ३० मेपर्यंत भारतात दाखल...
पुणे : अंदमानात दाखल झाल्यानंतर काहीसा थंडावलेला मान्सून येत्या २ ते ३ दिवसांत केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. सध्याची परिस्थिती अशीच अनुकूल राहिल्यास मान्सून ३० मेपर्यंत भारतात दाखल होईल, अशी शक्यता आहे. त्यानंतरच त्याचा प्रवास उर्वरित देशात होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अरबी समुद्राच्या खालच्या स्तरात पश्चिमी वारे सशक्त झाले आहेत. तसेच हे वारे खोलवर पोहोचले आहेत. उपग्रहांच्या चित्रांनुसार केरळच्या किनारपट्टीवर तसेच दक्षिण अरबी समुद्रावर ढगांची दाटी वाढली आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठीची स्थिती अनुकूल झाली आहे. याच काळात मान्सूनचा पुढील प्रवास दक्षिणपूर्व अरबी समुद्राच्या आणखी काही भागात व लक्षद्वीपमध्ये होण्यास अनुकूल स्थिती असेल.
राज्यात गेल्या २४ तासांत कोकण-गोवा, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, तर मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भातील काही ठिकाणी कमाल तापमानात किंचित घट झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या इतके होते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. तर त्यानंतरच्या दोन दिवसांत कोकण-गोवा, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात या काळात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुण्यात शुक्रवारी कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.