Monsoon 2024: केरळात २ दिवसआधी मॉन्सून, पुढील आठवड्यातच महाराष्ट्रात!
By श्रीकिशन काळे | Published: May 30, 2024 04:59 PM2024-05-30T16:59:14+5:302024-05-30T16:59:52+5:30
गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने सर्वांचीच चिंता वाढली. परंतु, यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस असल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे...
पुणे : शेतकरी आणि नागरिकांसाठी आनंदवार्ता असून, कधी येणार म्हणून ज्याची अतिशय आतुरतेने वाट वाहिली जात होती, तो माॅन्सून अखेर केरळमध्ये गुरूवारी (दि.३०) एक दिवस आधीच दाखल झाला आहे. त्याची वाटचाल वेगाने होत असून, लवकरच महाराष्ट्रात देखील दाखल होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने सर्वांचीच चिंता वाढली. परंतु, यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस असल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. सध्या माॅन्सून देखील चांगलाच सक्रिय असून, तो केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. गेल्या २४ तासांपासून केरळमध्ये मान्सूनचा जोरदार पाऊस सुरु झालेला आहे. गुरूवारी (दि. ३०) मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे.
काही दिवसांपासून देशातील तापमानाचा पारा चांगलाच कडाडला होता. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमान कमी झाले असून, विदर्भ, मराठवाड्यात मात्र प्रचंड उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. सध्या गेल्या २४ तासांपासून केरळमध्ये मान्सूनचा पाऊस जोरदार सुरु आहे. आता मॉन्सून महाराष्ट्रात पुढील आठवड्यात पोचेल, असा अंदाजही देण्यात आला आहे.
यंदा मॉन्सून चांगला बरसणार
दरवर्षी मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होतो. यंदा मात्र दोन दिवस आधीच तो दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही तो लवकरच येण्याची शक्यता आहे. यापूर्वी अंदमान निकोबारमध्ये मान्सून वेळेपूर्वीच म्हणजे १९ मे रोजी दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची वाटचाल चांगली राहिली आहे. यंदा देशभरात मान्सून चांगलाच बरसणार आहे. सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने पहिल्या एप्रिल आणि दुसऱ्या मे महिन्याच्या अंदाजामध्ये दिला आहे.
पाणीसंकट दूर होणार !
गतवर्षी देशामध्ये बऱ्याच भागांमध्ये मान्सूनने सरासरी देखील गाठली नव्हती. महाराष्ट्रात देखील कमी पाऊस झाला. परिणामी सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे. मे महिन्यातच राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा जवळपास संपलेला आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. इतर शहरांमध्येही दिवसाआड, चार दिवसाला, आठवड्याला एकदा असा पाणीपुरवठा होत आहे. या सर्व संकटावर आता मॉन्सूनमुळे दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनची तारीख
वर्ष - दाखल - वर्तविलेला अंदाज
२०१९ - ८ जून - ६ जून
२०२० - १ जून - ५ जून
२०२१ - ३ जून - ३१ मे
२०२२ - २९ मे - २७ मे
२०२३ - ८ जून - ४ जून
२०२४ - १ जून - ३० मे
केरळमध्ये दोन दिवसआधीच मॉन्सून दाखल झाला आहे. केरळमधील जवळपास ८५ टक्के भागांमध्ये तो व्यापला आहे. कन्नूर, कोईम्बतूर, कन्याकुमारीच्या भागात मॉन्सून पोचला आहे. केरळमध्ये १ जूनमध्ये मॉन्सून येईल, असा अंदाज दिला होता. पण तो ३० मे रोजीच दाखल झाला.
- डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ व माजी प्रमुख, आयएमडी, पुणे