पुणे : राज्यामध्ये मान्सून दाखल झाला असून, तो रत्नागिरी आणि सोलापूर भागात स्थिर आहे. त्याची पुढील वाटचाल शनिवारपासून (८ जून) होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे.
राज्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. यंदा कमी वेळेमध्ये अधिक पाऊस असा पॅटर्न राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. अगदी तसाच पॅटर्न सध्या पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये त्याचा फटका बसला आहे. कात्रज, लोहगाव आणि वडगावशेरीला ढगफुटीसारखा पाऊस पाहायला मिळाला.
सध्या मान्सून आल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सूनच्या सरींनी गारवाही तयार केला आहे. रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर हा दक्षिण भाग सोडला, तर राज्यातील उर्वरित भागात पूर्वमोसमी पाऊस होत आहे. दरम्यान, सध्या उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, मध्य प्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
‘मान्सूनचा दक्षिण कोकणात मुक्काम असून, पुढील वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. दक्षिण कोकणवगळता उर्वरित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी जोरदार पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट
९ जून : कोल्हापूर, सिंधुदुर्ग
१० जून : कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी
११ जून : कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा
सोमवारपर्यंत (१० जून) पुणे दक्षिण, नगर दक्षिण, सातारा, जालना, बीड, धाराशिव, लातूरपर्यंतच्या नऊ जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. मान्सून जेथे पोहोचला, त्यापुढे खरं तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची अपेक्षा असते. त्या पद्धतीने पाऊस कोसळताना दिसत नाही. त्यामुळे मान्सूनची प्रगती होत आहे. पण, ती दमदारपणे होताना दिसत नाही. शिवाय, मान्सूनची बंगाल उपसागरीय शाखा गेल्या पाच दिवसांपासून जागीच खिळलेली आहे. १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.
- माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ, पुणे