पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला वरुणराजाने हजेरी लावली आणि विजयी उमेदवारांचा आनंद द्विगुणित केला. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी पावसातही आनंदोत्सव साजरा केला. सकाळपासून प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या पुणेकरांना सायंकाळी वरुणराजाने दिलासा दिला. आकाशात ढगांची गर्दी झाली आणि जोरदार सरींची बरसात झाली. त्यामुळे काही मिनिटांमध्येच रस्ते पाण्याखाली गेले.
मान्सून केरळपासून पुढे सरकला असून, लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज राज्यासह पुण्यात देण्यात आला आहे. पुण्यात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील, बिबवेवाडी, धनकवडी, घोरपडी, मार्केट यार्ड, शिवाजीनगर, एरंडवणा, सातारा रोड, स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, सिंहगड रोड, कर्वेनगर आदी भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. शहरभर पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
मान्सून कुठे पोहोचला ?
मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या आणखी काही भागात, गोव्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा भागात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यात या ठिकाणी पावसाचा अंदाज
कोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यात पुढील पाच दिवस औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, लातूर, नांदेड, जालना, परभणी येथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल. विदर्भातही सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुण्यातील पाऊस
मगरपट्टा - ९ मिमी
पाषाण - ८.५ मिमी
कोरेगाव पार्क - ५.५
एनडीए - ४.० मिमी
राजगुरूनगर - २.५ मिमी
मान्सून गोव्यात पोहोचला असून, तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल. पुण्यामध्ये गुरुवारी (दि.६) मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आणि मुंबईमध्ये ९ जूनपर्यंत पोहोचेल. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
- डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ