पुणे : मॉन्सून दोन दिवसांपासून दक्षिण काेकणात मुक्कामी होता, तो शनिवारी पुढे सरकरला आहे. आज (दि.८) सोलापूरच्या पुढे बारामतीपर्यंत मॉन्सूनने मजल मारली आहे, तर दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिसा भागातही प्रवेश केला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
नैऋत्य मॉन्सूनला पुढील वाटचाल करण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शनिवारी (दि.८) मॉन्सूनचे वारे अरबी समुद्रातील आणखी काही भाग, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणाचा आणखी काही भाग, आंध्रप्रदेशची किनारपट्टीपर्यंत पोचले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून अरबी समुद्रातील काही भाग, महाराष्ट्रातील आणखी काही भाग (मुंबईपर्यंत), तेलंगणाचा आणखी काही भाग व्यापणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला.
हवामान खात्याच्या माहितीनूसार राज्यामध्ये कोकणात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हा पाऊस रविवारीपासून (दि.९ ते ११) दरम्यान होईल, त्यामध्ये रत्नागिरी, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडचा समावेश आहे.