पुणे : दरवर्षी पावसाळा नियमितपणे येतो; मात्र महापालिकेची पावसाळीपूर्व स्वच्छतेची कामे नियमित होत नाहीत. तीसुद्धा पावसाळ्याप्रमाणेच वेळापत्रक ठरवून त्याचवेळेत पूर्ण झाली पाहिजेत. ५ जूननंतर शहरात नाले किंवा गटारी सफाईचे एकही काम शिल्लक राहू नये असे आदेश महापालिका आयुक्त सौरव राव यांनी दिले.राव यांनी आपल्या कार्यालयात पावसाळीपूर्व कामांचा संपूर्ण शहराचा क्षेत्रीय कार्यालयनिहाय आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली, राजेंद्र निंबाळकर, घनकचरा विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप, ज्ञानेश्वर मोळक, माधव जगताप, उमेश माळी, माधव देशपांडे, संध्या गागरे, आपत्ती निवारण कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने; तसेच विविध विभागांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते.सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण नदी, नाले व त्यांची किती स्वच्छता झाली याची माहिती दिली. अनेक ठिकाणची कामे अपुरी असल्याचे त्यावरून लक्षात आले. काही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील कामे व्यवस्थित सुरू असल्याची माहिती देण्यात आली. पावसाळा दरवर्षी येतो,त्याचप्रमाणे नियमितपणे पावसाळापूर्व कामेही झाली पाहिजेत. त्याला विलंब होता कामा नये.पाऊस जोराचा झाला तर पाणीकुठे साचते, कुठे वाहते, कोणत्या वसाहती धोक्यात येतात याचीसर्व माहिती त्या त्या क्षेत्रीय कार्यालयाकडे असणे गरजेचे आहे. त्यानुसार कामे ठरवून ती पावसाळा सुरू होण्यापूर्वीच संपतील याची काळजी अधिकाºयांनी घ्यायला हवी, असे आयुक्त म्हणाले.धरणातून पाण्याचा विसर्ग कधी सोडतात त्याची पूर्वकल्पना महापालिकेला दिली जाते आहे किंवा नाही, याकडे लक्ष ठेवण्याची सूचना आयुक्तांनी केली. आपत्ती व्यवस्थापन विभागातील कामकाजाचीही माहिती त्यांनी घेतली. हा विभाग कायम सज्ज असावा, त्यांच्याकडे सर्व खात्यांनी त्यांची माहिती द्यावी, एखाद्या आपत्तीत या विभागाचा निरोप आला की, त्या खात्याने त्यांच्याकडे सोपवलेली जबाबदारी पार पाडली पाहिजे. या कामात समन्वय ठेवणे गरजेचे आहे असे आयुक्तांनी सांगितले.पाणी साचल्याच्या किंवा पाणी वसाहतीमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाल्यास तसे होण्याआधीच प्रशासनाला त्याची माहिती असायला हवी. तसे होण्यापूर्वीच त्या विभागातील नागरिकांना धोक्याच्या सूचना दिल्या जाव्यात, त्यासाठी सोशल मीडिया; तसेच आकाशवाणीसारख्या प्रसार माध्यमांचा वापर करावा असे आयुक्तांनी सांगितले.नाले, गटारी, ओढे; तसेच पाणी वाहून नेणाºया जागा स्वच्छ झाल्या, तर पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो, आपत्तीचे प्रसंग येत नाहीत त्यामुळे या काळात सर्व विभागप्रमुखांनी सतर्क राहावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. ५ जूननंतर एकही काम शिल्लक राहता कामा नये असे त्यांनी अधिकाºयांना बजावले.दरवर्षी महापालिका प्रशासनाच्या वतीने आपत्ती निवारण आराखडा प्रसिद्ध करण्यात येतो. यावर्षी तो अद्याप तयारच झालेला नाही अशी माहिती मिळाली. येत्या आठ दिवसांत सर्व विभागांच्या अधिकारी व त्यांच्या दूरध्वनीक्रमांकांसह, मदत केंद्रांच्या नावांसह हा आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पावसाळापूर्व सफाईची कामे अपूर्णच , ५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 6:50 AM