पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) देशात दाखल होण्यासाठीची अनुकूलता आणखी वाढली असून, पुढील २४ तासांत तो अंदमानच्या आणि बंगालच्या दक्षिणपूर्व उपसागरात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. अरबी समुद्रात बाष्पयुक्त ढगांची दाटी वाढली असून, त्यांची आगेकूच अंदमान-निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागराकडे सुरू आहे. त्यामुळे अंदमान-निकोबार बेट, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागात पाऊस पडत आहे, तर देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागांवर हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय असल्याने महाराष्ट्रासह, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उडिसा या राज्यांच्या काही भागांमध्येही पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत कार निकोबार बेट व विशाखापट्टणम येथे १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. पुढील २४ तासांत अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण
By admin | Published: May 17, 2014 5:35 AM