पुणे : अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळ ओसरु लागताच नैर्ऋत्य मोसमी वार्यांच्या आगमनाचे संकेत मिळाले आहेत. हवामान विभागाने अंदमान आणि लगतच्या दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात मॉन्सूनचे आगमन होण्याच्या दृष्टीने अनुकल परिस्थिती असून येत्या २१ मे रोजी अंदमानच्या समुद्रात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
मॉन्सूनच्या वार्यांचे साधारण २० ते २१ मेच्या दरम्यान अंदमानच्या समुद्रात आगमन होत असते. त्यानंतर साधारण १ जूनला मॉन्सून केरळ किनारपट्टीला येत असतात. ताक्ते चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या आगमनाला उशीर होईल का अशी शंका उपस्थित केली जात होती. परंतु, नेहमीप्रमाणे मॉन्सूनचे वारे अंदमानच्या समुद्रात येत असल्याची सुखद वार्ता हवामान विभागाने दिली आहे. त्याचबरोबर येत्या २३ मेपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश व विदर्भाच्या बर्याच भाात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपूरी येथे ४२.३ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
राज्यात दिवसभरात डहाणु येथे ४३ मिमी, पणजी ७, रत्नागिरी ०़३, कोल्हापूर ३, महाबळेश्वर १०, सातारा २, सांगली १, नागपूर ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यातील चक्रीवादळ ओसरले असून बुधवारी राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.