पुणे : जून आणि सप्टेंबर दरम्यान येणारा मान्सून या वर्षीही सामान्यच राहणार आहे. असा अंदाज सॅस्कॉफ (साऊथ एशियन क्लायमेट आऊटलूक फोरम) च्यावतीने नुकताच वर्तविण्यात आला आहे. याबरोबरच भारताच्या मध्य पूर्व आणि दक्षिणेकडील काही भागात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस होणार असून दक्षिणेकडील काही भागात कमी पाऊस होईल. एकूणच दक्षिण आशियाच्या वायव्य आणि इशान्येकडील भागात पावसाची सरासरी कमी राहील, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे संचालक आर. कृष्णन यांनी दिली.पुण्यात नुकतीच बारावी साऊथ एशियन क्लायमेट आउटलूक परिषद झाली. दोन दिवसीय या अभ्यास परिषदेचा समारोप शुक्रवारी झाला. डब्ल्यू. एम. ओ., भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णदेशीय हवामान -विज्ञान संस्था, पुणे आणि रीजनल इंटीग्रेटेड मल्टिहजर्ड अर्ली वार्मिंग सिस्टिम, यांच्यावतीने आयोजित परिषदेत दक्षिण आशियायी संघटना (सार्क) मधील बांग्लादेश, भुतान, मालदिव, म्यानमार, आणि श्रीलंका येथील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांना अमेरिका, जपान आणि भारत आदी देशांतील तज्ञांनी मार्गदर्शन केले. परिषदेत दक्षिण आशियायी देशांचे हवामान, पावसाची स्थिती, पावसाचा अंदाज, भविष्यातील हवामान अंदाज, याबरोबरच मान्सूनबद्दलच्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.पत्रकार परिषदेत कृष्णन म्हणाले, मान्सूनच्या आगमनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा ला निनो या घटकाचा प्रभाव काही अंशी कमी झाला आहे. असा निष्कर्ष सर्वानुमते काढण्यात आला आहे. काही काळापर्यंत समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामानबदलाला कारणीभूत ठरत असून ही क्रिया अधूनमधून अचानक घडते. या घटनेचा संबंध पृथ्वीवर होणारी दुष्काळी परिस्थिती, महापूर आणि त्याचा थेट पिकांच्या उत्पादनावर होणारा परिणाम याच्याशी जोडला जातो.काय आहे ला निनाएल निना व ला निना सागरी प्रवाह आहेत. याचा मान्सूनच्या वाऱ्यांवर परिणाम होतो व भारतीय उपखंडात पाऊस कमी जास्त होतो. पेरु व चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृतालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवर हवामानात मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो.
दक्षिण आशियात यंदाही मान्सून सामान्यच; साऊथ एशियन क्लायमेट आउटलूक परिषदेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:04 AM