ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ९ : नैर्ऋत्य मोसमी पावसाची (मॉन्सून) अनुकूलता वाढल्याने येत्या ४८ तासांत तो कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मॉन्सून गुरुवारी कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये दाखल झाला. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात विविध भागांमध्ये पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.मॉन्सून केरळमध्ये उशिरा ८ जूनला दाखल झाल्यानंतर त्याला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती कायम आहे. मॉन्सूनने आज आगेकूच करीत केरळ व तामिळनाडू राज्यांचा उर्वरित भाग, कर्नाटक राज्याची किनारपट्टी व इतर भाग, रायलसीमा व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी, बंगालच्या उपसागराचा मध्य भाग, आरबी समुद्राच्या मध्य भाग व्यापला. पुढील २ दिवसांत मॉन्सून गोव्यात आणि कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होणार आहे.दरम्यान, गेल्या २४ तासांत मालवण येथे सर्वाधिक १०० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली